संगमनेरात सापडली शस्त्र, तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

रात्री पावणेअकराच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱ्या एमएच. 14, 3600 या क्रमांकाच्या मोटारीतील युवकांची संशयावरुन झडती घेत असताना पाच जीवंत काडतुसे असलेला देशी बनावटीचा कट्टा व केएफ 7.65 कॅलीबरची नोंद असलेली 33 जीवंत काडतुसे आढळली.

संगमनेर : शहारतून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन अवैधरित्या देशी कट्टा व जीवंत काडतुसे बाळगणाऱ्या तीन युवकांना संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेर खुर्द शिवारातील रायतेवाडी फाटा येथे गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री पावणेअकरा वाजता पकडले.

दिलीप कोंडीबा खाडे ( वय 28 ), रा. म्हस्के बुद्रुक, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, बाबाजी बबन मुंजाळ ( वय 27 ) रा. डोंगरगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, दयानंद मारुती तेलंग ( वय 30 ), रा. टाकळी हाजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा - अय भंगार क्वॉलिटीच्यांनो, आधी बघा ते करतात ते...

या बाबत अधिक माहिती अशी, नाशिककडून पुण्याकडे एका मोटारीतून अवैध शस्त्रासह काही युवक जाणार असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून मिळाल्याने, पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर खुर्द शिवारातील रायतेवाडी फाटा येथे पोलिस पथकाने सापळा लावला होता.

मध्यरात्री केली कारवाई

रात्री पावणेअकराच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱ्या एमएच. 14, 3600 या क्रमांकाच्या मोटारीतील युवकांची संशयावरुन झडती घेत असताना पाच जीवंत काडतुसे असलेला देशी बनावटीचा कट्टा व केएफ 7.65 कॅलीबरची नोंद असलेली 33 जीवंत काडतुसे आढळली.

३८ काडतुसे सापडली

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मोटार, तीन मोबाईल, देशी बनावटीचे पिस्तूल व 38 काडतुसे असा सुमारे 5 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस नाईक विजय पवार यांच्या फिर्यादीवरुन तीघांविरोधात बेकायदेशिर शस्त्र बाळगण्याच्या आरोपावरुन, भारतीय हत्यार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

या कारवाईत पोलिस निरीक्षक अभय परमार, उपनिरीक्षक संजय कवडे, सहायक पोलिस निरीक्षक एन. जी. साबळे, पोलिस नाईक विजय पवार, पोलिस काँस्टेबल सुभाष बोडके, अमृता आढाव प्रमोद गाडेकर, साईनाथ तळेकर यांनी सहभाग घेतला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three were found in pistols and bullets