मेडिकल कॉलेजची तीन वर्षे प्रतीक्षाच

प्रवीण जाधव 
शुक्रवार, 29 जून 2018

सातारा - मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर प्रत्यक्षात कॉलेज सुरू झाल्याच्या थाटात प्रत्येक जण श्रेय घेण्यासाठी पुढे आला. मात्र, प्रत्यक्षात पुढील प्रयत्न योग्य प्रकारे झाले, तरी कॉलेज सुरू होण्याला अजून तीन वर्ष लागण्याची शक्‍यता आहे. प्रशासकीय यंत्रणांचा दिरंगाईचा कारभार व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच या विलंबाला कारणीभूत आहे.

सातारा - मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर प्रत्यक्षात कॉलेज सुरू झाल्याच्या थाटात प्रत्येक जण श्रेय घेण्यासाठी पुढे आला. मात्र, प्रत्यक्षात पुढील प्रयत्न योग्य प्रकारे झाले, तरी कॉलेज सुरू होण्याला अजून तीन वर्ष लागण्याची शक्‍यता आहे. प्रशासकीय यंत्रणांचा दिरंगाईचा कारभार व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच या विलंबाला कारणीभूत आहे.

येथील मेडिकल कॉलेजसाठी कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाची जागा देण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला. त्यामुळे या कॉलेजच्या मार्गातील असलेला मोठा अडसर दूर झाला आहे; परंतु त्यामुळे सातारकरांना लगेचच या सुविधेचा लाभ मिळेल, अशी शक्‍यता सध्या तरी दिसत नाही. जागेचा प्रश्‍न सुटलेला असला, तरी चार वर्षांपेक्षा अधिक काळ ही प्रक्रिया रेंगाळली आहे. प्रशासनाचा निरूत्साह आणि लोकप्रतिनिधींमधील कलगीतुरा, पाठपुराव्याचा अभाव याला कारणीभूत आहे. वस्तूत: साताऱ्याबरोबर मान्यता मिळालेल्या इतर कॉलजेचे बांधकम पूर्ण होऊन प्रत्यक्षामध्ये शिक्षणासह सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक उपचारांची सुविधा सुरू झाली. जागेचा प्रश्‍न मिटल्यावर सर्वच लोकप्रतिनिधी महाविद्यालय सुरू झाल्याच्या थाटात श्रेयवादासाठी चढाओढ करताना दिसत आहेत; परंतु हे कॉलेज सुरू होण्यातील अडचणींकडे अद्याप त्यांनी लक्ष दिलेले नाही. किंबहुना अजून किती पाणी उतरायची याचा अंदाजही त्यांना नाही. जागेचा निर्णय लावण्यात चार वर्ष गेल्यामुळे साताऱ्यातील कॉलेजला मिळालेली मान्यता आयएमएने (इंडियन मेडिकल असोसिएशन) काढून घेतली आहे. त्यामुळे आता ती मान्यता पुन्हा मिळवावी लागणार आहे. मुळात मंत्रिमंडळाची मान्यता झाली असली, तरी प्रत्यक्षात जागेचे हस्तांतरण वैद्यकीय शिक्षण विभागाकडे होणे बाकी आहे. त्यासाठी मुख्य सचिवांनी जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार  केला आहे. 

प्रशासकीय कारभारात त्याला किती वेळ जातो हे पाहावे लागेल. त्यानंतर आयएमएशी पत्रव्यवहार करून पुन्हा मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. मान्यता आल्यानंतरच इमारतीच्या बांधकामाचे टेंडर काढता येईल. इमारत पूर्ण झाल्याशिवाय कॉलेजसाठी आवश्‍यक असलेली साधनसामुग्री व स्टाफची भरती करता येणार नाही. इमारत व स्टाफची भरती प्रक्रिया झाल्याशिवाय प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू करता येणार नाही. या सर्व प्रक्रियेला किमान तीन ते चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. 

त्यापूर्वी कॉलेज सुरू करावयाचे असल्यास त्याला तीव्र राजकीय इच्छाशक्ती व पाठपुराव्याची आवश्‍यकता आहे. ती सध्या तरी साताऱ्यातील कोणत्या लोकप्रतिनिधींमध्ये दिसत नाही. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधांचा लाभ सातारकरांसाठी सध्या तरी मृगजळच ठरण्याची शक्‍यता आहे.

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज
वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी अजूनही अनेक प्रक्रियांचा टप्पा पार करावा लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक पातळीवर ठोस पाठपुरावा आवश्‍यक आहे. त्यामुळे जागा मिळाल्यामुळे हुरळून जाण्यापेक्षा प्रत्यक्ष कॉलेज सुरू होईपर्यंत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे.

Web Title: Three years of waiting for the medical college