मालट्रकच्या धडकेत कारमधील तीन युवकांचा मृत्यू

आनंद गायकवाड
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेरजवळ कऱ्हे घाटात मालट्रकला पाठीमागून कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेरजवळ कऱ्हे घाटात मालट्रकला पाठीमागून कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

काल (बुधवारी) रात्री अकराच्या सुमारात हा अपघात झाला. गणेश सुखदेव दराडे (वय : 29 रा, कऱ्हे, ता. संगमनेर), श्रीकांत बबन आव्हाड ( वय 28, रा. दरेवाडी, ता. संगमनेर, हल्ली रा. सिन्नर) व अजय श्रीधर पेंदाम (वय: 27 रा. पांजरेपार, ता. नागबिड, जि. चंद्रपूर)अशी या अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत.

कऱ्हे घाटाजवळ मालट्रकला (एम.एच. 12 के.पी. 1799) पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने (एम.एच. 19 बी.जे. 8111) जोराची धडक दिली. त्यात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात गंभीर जखमी झालेल्या कारमधील तिघाही युवकांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी, पोलिस कॉन्स्टेबल रफिक पठाण, तालुका पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधील तिघा युवकांना बाहेर काढले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

नांदूर शिंगोटे येथून हे तरुण कऱ्हे गावाकडे येत होते. पुढे चाललेल्या मालट्रकला त्यांनी पाठीमागून धडक दिली. त्यात कारचा चक्काचूर झाला. या अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक बराचवेळ ठप्प झाली होती. जखमी तरुणांना घुलेवाडी (ता. संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तथापि, तिघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, वैद्यकिय अधिकाऱ्यांनीच दिलेल्या खबरीवरुन संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात आज अकस्मात मृत्यूची नोंद झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three youths killed in car crash