50 युवकांचा बच्चू कडूसोबत पदभ्रमंतीचा रोमांचकारी अनुभव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

पन्हाळगड जि. कोल्हापूर ऐतिहासिक पन्हाळगड किल्ला ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू, सावली फाउंडेशनचे उमेश भालसिंग सहभागी झाले.
 

शेवगाव: पन्हाळगड जि. कोल्हापूर ऐतिहासिक पन्हाळगड किल्ला ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू, सावली फाउंडेशनचे उमेश भालसिंग सहभागी झाले.

छत्रपती शिवाजी महाराज व बाजी प्रभू देशपांडे यांच्या लढवय्या वृत्तीचे दर्शन घडवणाऱ्या ऐतिहासिक पन्हाळगड ते पावनखिंड या मार्गावर पदभ्रमंती मोहिमेत शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यातील सुमारे 50 युवकांनी रोमांचकारी अनुभव घेतला. प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीत त्यांनी ता. 13 ते ता. 15 जुलै 2018 दरम्यान ही पदभ्रमंती मोहिम पार पडली.

यंदा मोहिमेचे पाचवे वर्ष असून राज्यातील सुमारे 700 शिवभक्त सहभागी झाले होते. शुक्रवारी ता. 13 रोजी सकाळी सात वाजता हिंदवी परिवार संस्थेचे सदस्य व आयुर्वेद कॉलेज शेवगांवचे प्राध्यापक डॉ. शिवरत्न शेटे, प्रहार क्रांती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पन्हाळगड किल्ल्यावरील वीर शिवा काशिद यांना अभिवादन करून प्रत्यक्ष मोहिमेला सुरूवात झाली.

प्रा. डॉ. शेटे व आमदार कडू हे दरवर्षी मोहिमेत सहभागी होत असल्याने युवकांचा उत्साह वाढत आहे. मागील वर्षी विशेष पोलिस महासंचालक विश्वास नांगरे, पानिपतकार विश्वास पाटील, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, मुख्यमंत्री निधी कार्यालयातील ओमप्रकाश शेटे हे या मोहिमेत सहभागी झाले होते.

छत्रपती शिवरायांनी सन 1660 साली ऐतिहासिक पन्हाळगड किल्याभोवतीची शत्रूचा वेढा तोडून ज्या मार्गाने पावनखिंडी मार्गे विशालगडाकडे प्रयाण केले होते. स्वामिनिष्ठ बाजीप्रभू देशपांडे यांनी जीवाची बाजी लावून शत्रुशी युद्ध करीत खिंड रोखून धरल्याने छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी रित्या विशालगडावर सुखरूप पोचले होते. याच ऐतिहासिक मार्गावर पन्हाळगड किल्ला ते  पावनखिंड पदभ्रंमंती केली जाते. पदभ्रमंतीचा मार्ग आजही अत्यंत दुर्गम, खडकाळ, डोंगर द-या, ओढे व जंगली भागाचा असल्याने रोमांचकारी अनुभवांची अनुभूती मिळत असल्याचे  सावली फाऊंडेशनचे प्रमुख युवा नेते उमेश भालसिंग यांनी सांगीतले.

तालुक्यातील उमेश भालसिंग, भगवान भालसिंग, गौरव भालसिंग, सोमेश्वर शेळके, माऊली डोंगरे, भैय्या दातीर यांच्यासह मंखळ पांढरे, अंबादास दिंडे, रामदास पांढरे, गणेश कापसे, किरण तहकिक, दीपक भुसारी, संदिप पवार व अरूण मोरे आदींसह 50 युवकांनी या पदभ्रमंतीत सहभाग घेतला. यामध्ये सहभागी युवकांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली.

Web Title: Thriller experience of 50 youths with a bacchu kadu