टिकटॉक्‌... जीवावर बेतू नये ! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा रेल्वेतून पडून झालेला अपघात सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. अशा गोष्टी आता आपल्यापासून लांब नाहीत. अगदी सांगलीतील एका नामवंत शाळेत मंगळवारी जो प्रकार घडला त्याने सर्वच पालकांची चिंता वाढली आहे

 अघोरी प्रकारच्या उड्या मारून एकमेकाला पाडणे आणि त्यातून होणाऱ्या विनोदाचा हशा शेयर करणे ही एक विकृती विद्यार्थ्यांत मोबाईलमुळे येऊ लागली आहे. सांगलीतील अवघ्या आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांचा हा प्रतापाची सर्वत्र चर्चा आहे. एकाला उडी मारायला लावली आणि दोघांनी त्याला पाडले पण ते एका मुलाच्या जीवावर बेतले. त्याचा हात फॅक्‍चर झाला. डोक्‍यालाही मार बसला. सुदैवाने तो थोडक्‍यात वाचला आहे.

टिकटॉकचे वेड नव्या पिढीच्या डोक्‍यावर भूत बनून बसले आहे. यातून काही बोध घेणार आहोत की नाही? कमी वेळात खूप लोकांसमोर स्वतःला हिरो, हिरोईन सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होत असलेल्या या गंभीर चुका जीवघेण्या ठरत आहेत. त्याला शंभर टक्के रोखणे अशक्‍य आहे, मात्र सुरक्षिततेची जाणीव करून देणे आणि चुकीचे होत असेल तर त्याला त्या क्षणी रोखणे, एवढाच पर्याय या गर्दीत तारतम्य असलेल्या लोकांच्या हाती आहे. यावर तज्ज्ञांची मते. 

फेसबुक आणि वॉटस्‌अप या जगविख्यात सोशल साईटला टक्कर देणाऱ्या टिकटॉक्‌ने तरुणाईला वेड लावले आहे. जगभरात त्याचा चाहता वर्ग वाढलाय आणि आपणही या आभासी जगाचे प्रवासी व्हावे, असे दररोज हजारो नव्या लोकांना वाटते आहे. याबाबतच्या सर्वेक्षणातील काही आकडे तेच सिद्ध करणारे आहेत. सन 2019 मध्ये 740 मिलियन लोकांनी ही साईट डाऊनलोड केली. मद्रास उच्च न्यायालयाने टिकटॉक्‌वर लहान मुलांबाबतचे आक्षेपार्ह्य व्हिडिओ डाऊनलोड होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर टिकटॉक्‌वर बंदीचे आदेश दिले होते. त्यानंतरही तीच स्थिती कायम आहे. 

व्हिडिओ वाईट नाही, तारतम्य हरवले आहे

पौगंडावस्थेतील बदलांनी या गोष्टीला सुरवात होते. ती या वयाची गरज असते. लोकांनी मला चांगले म्हटले पाहिजे, ग्रुपने भारी म्हटले पाहिजे, अशी मानसिकता होते. त्यातच मग मोबाईलसारखी संसाधने हाती आल्यावर व्हायरलचा नाद लागतो. आंधळे धाडस दाखवले जाते. त्यातून लिमिट क्रॉस होतेय. खरे तर ही या वयोगटात गरज असते, मात्र त्यात अतिरेक होऊ नये, हे महत्त्वाचे. टिकटॉक व्हिडिओ करणे वाईट नाही. ते करताना सुरक्षिततेचे भान पाहिजे. लोकांनी एकवेळ चांगले नाही म्हटले तरी चालेल, मात्र जीवाची रिस्क नको, ही मानसिकता असली पाहिजे. अर्थात, रिस्क टेकिंग हा या वयोगटाचा कॉमन विषय आहे. जेवढी भारी रिस्क घेऊ तेवढा भारी व्हिडिओ होतो, असे या वयोगटाला वाटते. अशावेळी पालक आणि शाळांनी मुलांना तारतम्य शिकवावे, एवढेच आपल्या हाती आहे. ते जोवर होत नाही तोवर असे अपघात होत राहतील. 

- चारुदत्त कुलकर्णी,  मानसतज्ज्ञ, सांगली 

शिक्षकांना चिंता वाटतेय 

मुलांचा टिकटॉककडे ओढा दिसतोच आहे. ते व्हिडिओ पाहतात, अपलोड करतात, त्यावर चर्चा करतात. त्यातून काहींचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याची गोष्टही लक्षात येते. मुलांवर या साऱ्याचा शारीरिक आणि मानसिक परिणाम होतोय. काही मुले मैदानानावर असतात, ती तास चुकवता आणि मोबाईल पाहतात, अशाही तक्रारी आहेत. ही फक्त आमच्या शाळेची नव्हे तर बहुतांश शाळांतील स्थिती आहे. त्यावर नियंत्रणासाठी शाळा म्हणून आम्ही प्रयत्न करूच, मात्र पालकांनी मुलांबाबत काही गोष्टींची काळजी घ्यावी. त्यांना मोबाईल वापरायला इतकी सूट देऊ नये, हे अधिक महत्त्वाचे आहे. ते काय अपलोड करताहेत, काय शेअर करताहेत, याकडे लक्ष असले पाहिजे. 

- चंद्रकांत कोष्टी,  मुख्याध्यापक, जी. ए. हायस्कूल व ज्यू. कॉलेज 

पालक म्हणून भीती वाटते 

मी परवाच वॉटस्‌ऍपवरचा तो व्हिडिओ पाहिला, ज्यात बाजूला उभी राहिलेली दोन मुले एका मुलाला उडी मारायला लावतात आणि त्याचा पाय बाजूला करून त्याला पाडतात. हा व्हिडिओ पाहून मला भीती वाटली. तो मधला पडलेला मुलगा माझा असेल तर... असे वाटून गेले. घाबरले मी. भीती वाटून मी माझ्या मुलांना तो व्हिडिओ दाखवला. त्यांना समजावले. असे कुणी करत असेल तर सावध रहायला सांगितले. तुम्ही असे कुणाबाबत करू नका, असेही सांगितले. ही पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. अन्य मुलांबाबत असे घडत असेल तर तसे होऊ नये म्हणूनही या मुलांनी दक्षता घ्यावी, असे मला वाटते. पालकांची आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. सारेच लाईटली घेऊन चालणार नाही. काही गोष्टींवर नियंत्रण ठेवलेच पाहिजे. 

- शाल्मली वझे, पालक 

इंटरनेटचा अभ्यासाठी उपयोग हवा 

टिकटॉकमध्ये व्हिडिओचे अनुकरण केले जाते. मात्र, हे व्हिडिओ जीवघेणे ठरताहेत. यासाठी पालकांनीच विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्याची गरज आहे. तसेच 
इंटरनेटच्या जमान्यात टिकटॉककडे असो की अभासी जगातील मैत्र असो याकडे आजच्या तरुणाईचा अधिक कल आहे. इंटरनेटचा अभ्यासासाठी उपयोग करायला हवा. जेणेकरून नवनवे अपडेट विद्यार्थ्यांना मिळत राहतील. तसेच मोबाईल गेममुळे मैदानावरील खेळ कमी झाले आहेत. यासाठीही पालकांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे मला वाटते. 
- मनीषा दुबुले,  अप्पर पोलिस अधीक्षक, सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TICKETTOCK ... may risk to life !!