दारूमुक्त गावांसाठी निर्धार करण्याची वेळ

दारूमुक्त गावांसाठी निर्धार करण्याची वेळ

गावोगावी सोमवारी महाराष्ट्रदिनी (ता. १ मे) होणाऱ्या ग्रामसभेत दारू दुकानांच्या परवान्यासाठी येणारे अर्ज नामंजूर होण्यासाठी सजग राहिले पाहिजे. प्रत्येक गावाने ही भूमिका घेतली, तर दारूविरोधातील चळवळीला बळ मिळणार आहे. दारूबंदीसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांना ताकद मिळणार आहे. दारू दुकानाला आपल्या गावात परवानगी मिळू नये, म्हणून एकजुटीने निर्धार करण्याची वेळ आली आहे. विशेषतः महिला वर्गाने संघटित होऊन आपले गाव दारूमुक्त करण्यासाठी रणरागिणीचे रूप धारण केले पाहिजे.
          
मानवी मनाचे कोडे न उलगडणारे असते. चांगल्या गोष्टी समजण्यासाठी वेळ लागतो; पण वाईट गोष्टी लगेचच आत्मसात होतात. वाईट गोष्टींमुळे व्यक्तिगत नुकसान होते. समाजाचीही हानी होते; पण लक्षात कोण घेतो, अशी परिस्थिती निर्माण होते. दारू ही अशीच एक गोष्ट. तिचे परिणाम वाईटच होणार आहेत, हे माहिती असूनही तिच्या आधीन होणारे अनेक जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. दारूमुळे आयुष्ये बरबाद झाल्याची अनेक उदाहरणे पाहिलेली असतात, तरीही व्यक्तिगत पातळीवर दारूचे समर्थन करणारेही अनेक महाभाग असतात. आपले व इतरांचे आयुष्य नासवणाऱ्या दारूला दूर ठेवण्यासाठी सामूहिक पुढाकाराची गरज आहेच; पण दारूला कृतिशील विरोध करण्याची व्यक्तिगत मानसिकता बळावणे आवश्‍यक बनले आहे.

राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावरील दारू दुकाने बंद होऊन महिना झाला. ही दुकाने बंद झाल्याचे अनेकांना दुःखही झाले. दारूच्या व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान पाहून काही जणांचे कंठही दाटून आले. दारूच्या दुष्परिणामांमुळे होरपळलेले अनेक संसार त्यांना आठवत नव्हते. दारू दुकाने बंद झाल्यामुळे अनेक मायभगिनींना मात्र दिलासा मिळाला असेल, तरीही अशा निर्णयामुळे दारू पूर्ण बंद होत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच महामार्ग किंवा राज्य मार्गावरील दुकाने बंद झाली तरी गावठाणातील इतर दुकानांजवळची गर्दी वाढली. गावागावांतील वाहतुकीच्या कोंडीत नव्या ठिकाणांची भर पडली. अज्ञातस्थळी दारू दुकान टाकले तरी पिणारा तिथंपर्यंत जातोच. या निर्णयामुळे महामार्गावरील दारू दुकाने बंद झाली; पण गावातील छोटे रस्ते आणि बोळ नव्याने महामार्ग होऊ लागले त्याचे काय? राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’मधील सुधाकर जागोजागी दिसू लागले. या निर्णयानंतर एक पाऊल पुढे जाऊन पूर्ण दारूबंदीच्या दिशेने गेले तरच परिस्थिती काही बदलू शकेल. नियम किंवा कायद्यातून हा बदल घडण्यापेक्षाही व्यसनविरोधी मानसिकता मजबूत करण्यासाठीच प्रयत्न व्हायला पाहिजेत. दारूबंदीसाठी राज्यात काही काळ चळवळीचे चांगले वातावरण होते. आता या चळवळीही क्षीण झाल्या आहेत. महिलांनी ठराव करून दारूबंदी झालेली अनेक गावे आहेत. आज त्या गावांतील परिस्थिती पाहिली की विषण्णता समोर येते. कोणत्या ना कोणत्या मार्गाने दारू त्या गावात पोचते. अनेक ठिकाणची दारूबंदी कागदावरच झाली आहे. सुधाकर दारूच्या नशेत आकंठ बुडत असल्यामुळे सिंधूचे हाल गावोगावी सुरूच आहेत. 

महामार्गावरील दुकाने बंद झाल्याने सहज उपलब्ध होणारी दारू बंद झाली. हा परिणाम चांगला आहे. मात्र, महामार्गावरील दारू दुकाने बंद करणे हा उपाय नाही तर पूर्ण दारूबंदीची हाक आता दिली पाहिजे. कारण आजच्या जीवनशैलीत दारूला प्रतिष्ठा मिळू लागली आहे. त्याचा धोका मोठा आहे. सरकारला दारूपासून उत्पन्न मिळत असल्याने दारूबंदी व्हावी, असे एका बाजूला म्हणले जात असले, तरी महसुलासाठी दारूला प्रोत्साहन देण्याचेच काम दुसऱ्या बाजूने होत राहते. महामार्गावरील दुकानांना संरक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या युक्‍त्याही पुढे येऊ लागल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेने गावाजवळील रस्ते ताब्यात घेऊन दुकानांना मुभा मिळवण्याचे प्रयत्न आहेत. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यापासून दूर; परंतु गावात दुकान थाटण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गावोगावच्या ग्रामसभांमधून दारू दुकानाला परवानगी देण्यासाठीचे अर्ज दाखल होऊ लागले आहेत. दारूबंदी सरकारकडून होणार नाही, दारूच्या अर्थकारणात गुतलेल्या हितसंबंधियांकडून दारूबंदीला विरोधच होणार आहे. या गोष्टी लक्षात घेऊन आता सर्वसामान्यांनीच दारूविरोधातील लढ्याला ताकद दिली पाहिजे. गावोगावी सोमवारी महाराष्ट्र दिनी (ता. १ मे) होणाऱ्या ग्रामसभेत दारू दुकानांच्या परवान्यासाठी येणारे अर्ज नामंजूर होण्यासाठी सजग राहिले पाहिजे. तात्कालिक फायद्यासाठी किंवा हितसंबंध जपण्यासाठी काही ग्रामसभांमधून अशा दुकानांना परवानगी दिली जाण्याची भीती असते.

मात्र, तात्कालिक फायदा न पाहता दारूचे होणारे दुष्परिणाम आणि दूरगामी परिणाम लक्षात घेऊन दारू दुकानांना आपल्या गावात परवानगी नाकारणेच समाजहिताचे ठरणार आहे. प्रत्येक गावाने ही भूमिका घेतली तर या चळवळीला बळ मिळणार आहे. दारूबंदीसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांना ताकद मिळणार आहे. दारू दुकानाला आपल्या गावात परवानगी मिळू नये, म्हणून एकजुटीने निर्धारकरण्याची वेळ आली आहे. विशेषतः महिलावर्गाने संघटित होऊन आपले गाव दारूमुक्त करण्यासाठी रणरागिणीचे रूप धारण केले पाहिजे. आयुष्य सुंदर आहे. त्याची सुंदरता ओळखता आली पाहिजे. दारूच्या व्यसनाची कुरूपता या सुंदरतेला लागलेले ग्रहण आहे. प्रत्येकाचे जगणे सुंदर होऊन चांगल्या सहजीवनातून वाट चालायची असेल तर दारूच्या नशेला हद्दपार केलेच पाहिजे. ग्रामसभेच्या निमित्ताने दारूच्या नशेला तडाखा देण्याची वेळ सर्वांनी साधली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com