घुंगराचा आवाजही झाला मुका...

सुनील गर्जे
Monday, 27 April 2020

नगर जिल्ह्यात परवानाधारक जामखेड चार, सुपे दोन आणि पांढरीपुल, वडाळा बहिरोबा, नांदगाव (नगर) प्रत्येकी एक असे एकूण नऊ कलाकेंद्राच्या नृत्यांगना, गायिका, सोंगाड्या, तबला, पेटी व ढोलकी वादकसह इतर कामगार असे तब्बल 945 कलावंत व त्यांच्या परिवाराच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नेवासे,  : लाज धारा पाहूनं जरा, जनाची मनाची... पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची... असे म्हणत तमाशा सम्राज्ञी (स्व.) विठाबाई यांनी तमाशा, कलाकेंद्राच्या माध्यमातून कलासाधनेद्वारे मनोरंजन करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या तमाशा कलावंत, नृत्यांगणांच्या व्यथा मांडल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कलाकेंद्रे बंद पडल्याने या कलावंतांची स्थिती गंभीर आहे. समाजाचे मनोरंजन व जनजागृती करणाऱ्या या कलाकारांसाठी शासनानेच आता पाऊल उचलावे, अशी अपेक्षा या कलावंतांची आहे. 

नगर जिल्ह्यात परवानाधारक जामखेड चार, सुपे दोन आणि पांढरीपुल, वडाळा बहिरोबा, नांदगाव (नगर) प्रत्येकी एक असे एकूण नऊ कलाकेंद्राच्या नृत्यांगना, गायिका, सोंगाड्या, तबला, पेटी व ढोलकी वादकसह इतर कामगार असे तब्बल 945 कलावंत व त्यांच्या परिवाराच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एरवी रसिकांच्या गर्दीने गजबजलेल्या या कलाकेंद्राला आज अवकळा आली आहे. नगरसह परजिल्ह्यांतून आलेल्या कलावंतांचे पोट या कलाकेंद्रावर विसंबून आहे. मात्र, उन्हाळ्याचा पैसे कमावण्याच्या हंगामातच कोरोनाच्या संकटाने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे.

 
यातील बहुतांशी कलावंत निराधार आहेत. त्यांचा सर्व उदरनिर्वाह कला केंद्रावरच आवलंबून आहे. मात्र, तेही बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकेंद्र चालकांचे शिष्ठमंडळाने नुकतीच राष्ट्रवादी कोंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट त्यांनी राष्ट्रवादी वेल्फेयर सेलच्या माध्यमातून कलावंतांना आर्थिक मदत दिली. मात्र, रोजिरोटीसाठी संघर्ष करणाऱ्या या कलावंतांना आता शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. 
लॉक डाउन नंतर या कलावंतांना कोणतीही मदत मिळाली नाही. कोणीतरी मदत करेल, या अपेक्षेने प्रत्येक दिवस ते घालवित आहेत. कोरोनाच्या विळख्याने सर्वच व्यवसाय-धंदे बंद पडले आहेत.

ऐन कमाईच्या काळात या संकटाने गाठल्याने या कलावंतांसमोर वर्षभराचा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. कारण, या पैशावरच कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे वर्षभराचे नियोजन केले जाते. 

यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न 
कोरोना संसर्गामुळे ऐन हंगामात तमाशा कलावंत, नृत्यांगना, गोंधळी, बहुरुपी, वासुदेव, वाघ्या-मुरळी, मसनजोगी, नायपंथी, गोसावी, नंदिवाले, शेती औजारे भटके कारागीर, बॅंड वादक, केटरिंग कामगार आदींवर डाउनपासून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

"राज्यात सर्वाधिक जामखेडमध्ये 300 पेक्षाजास्त कलावंत आहेत. फक्त कलाकेंद्रावरच त्यांची उपजीविका अवलंबून आहे. रोजनदारीचे कोणतेच साधन नसल्याने आमच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला शासनाने तातडीने मदत करावी अन्यथा ही कला व कलावंत संपूष्टात येईल. - अलका जाधव जामखेडकर, कलावंत, जामखेड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A time of famine on folk artists