जि. प. शाळेत मिशन "तंबाखूमुक्ती' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या बाराशे शाळा तंबाखूमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. सलाम मुंबई फौंडेशनने हाती घेतलेल्या उपक्रमास प्रतिसाद मिळत असून गुरुजींसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे. 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या बाराशे शाळा तंबाखूमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. सलाम मुंबई फौंडेशनने हाती घेतलेल्या उपक्रमास प्रतिसाद मिळत असून गुरुजींसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे. 

भावी पिढी व्यसनमुक्त व्हावी, शालेय जीवनात तंबाखूचे दुष्परिणाम समजावेत, या हेतूने जिल्हा परिषदेच्या दोन हजार शाळांत जनजागृती करण्यात येत आहे. सलाम मुंबई फौंडेशनने सतरा शाळांना तंबाखूमुक्त शाळा म्हणून गौरविले आहे. प्रत्यक्षात बाराशे शाळा तंबाखूमुक्तीच्या मार्गावर असल्याचे शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी "सकाळ'ला सांगितले. ते म्हणाले. तंबाखूमुक्तीसाठी फौंडेशनने तेरा निकष दिले आहेत. यात शाळेत पाहुणा म्हणून कोणी आला आणि गुरुजी तंबाखूचे सेवन करत असतील ते तातडीने थांबविणे, शाळेच्या आवारात तंबाखूचे दुष्परिणाम सांगणारे फलक लावणे, शाळेच्या स्टेशनरीवर तंबाखूमुक्त शाळा असा उल्लेख करणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी वेळी डॉक्‍टरांचे व्याख्यान ठेवणे, गावात जनजागृती फेरी या माध्यमातून तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न होणार आहेत. संबंधित संस्था अथवा शाळा खरंच तंबाखूमुक्त आहे का, याची उलट तपासणी फौंडेशनच्या सदस्यांकडून होते. त्यामुळे एकदा प्रमाणपत्र घेतले की काही केले तरी चालते, या समजुतीत कुणी राहू नये. तंबाखूचे सेवन आढळून आले तर प्रमाणपत्र रद्दही होऊ शकते. 
भावी पिढी सक्षम आणि निरोगी घडविण्यासाठी केवळ तंबाखूच नव्हे, अन्य व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. त्यामुळे तंबाखूमुक्त शाळा या उपक्रमाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. शालेय जीवनात संस्कार होतात ते आयुष्यभर टिकतात, असे म्हटले जाते. जिल्हा परिषदेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपक्रमासाठी सहकार्य करावे. 

Web Title: tobacco Liberation in zp school