तंबाखूजन्य पदार्थांची तहसीलदारांना भेट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

पारनेर - शाळेच्या परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदा विक्री थांबत नसल्याने येथील व्यसनमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार भारती सागरे यांना आज तंबाखूजन्य पदार्थांची भेट देऊन निषेध व्यक्त केला.

पारनेर - शाळेच्या परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदा विक्री थांबत नसल्याने येथील व्यसनमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार भारती सागरे यांना आज तंबाखूजन्य पदार्थांची भेट देऊन निषेध व्यक्त केला.

तालुक्‍यातील शाळांच्या प्रवेशद्वारांसमोर व्यसनमुक्तीच्या जागृतीसाठी धूम्रपानविरोधी फलक लावावेत, शाळेच्या परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदा विक्री थांबवावी, या मागण्यांचे निवेदन व्यसनमुक्ती चळवळीतर्फे तहसीलदारांना देण्यात आले होते. मात्र, त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने तालुका व्यसनमुक्ती चळवळीचे शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसीलदार सागरे यांना तंबाखूजन्य पदार्थांचे बॉक्‍स भेट देऊन निषेध नोंदविला.

त्यानंतर लगेचच सागरे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना बोलावून शाळा-महाविद्यालयांसमोर जागृतीबाबत फलक लावण्याचा आदेश दिला. तालुक्‍यातील मुख्याध्यापकांची बैठक घेऊन 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक शाळेच्या प्रवेशद्वारावर व्यसनमुक्तीचे फलक लावण्यात यावेत. शिक्षकांनी धूम्रपान करू नये, शाळांमध्ये व्यसनमुक्तीवर कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या.

शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला.

तालुक्‍यातील सर्व शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर 15 ऑगस्टपर्यंत व्यसनमुक्तीचे फलक लावण्यात येतील. शाळेच्या आवारातील दुकानांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
- भारती सागरे, तहसीलदार

Web Title: Tobacco substances gift to tahsildar