करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा

कोल्हापूर - नवरात्रोत्सवातील मुख्य दिवस आज (ता. १७) असून, अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची उत्सवमूर्ती वाहनात विराजमान होऊन भाविकांच्या भेटीसाठी बाहेर पडेल. 

रात्री बारानंतर जागर महापूजेला प्रारंभ होईल.नगरप्रदक्षिणेसाठी गुजरी मार्ग विद्युतरोषणाईने उजळून निघाला आहे. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, गुरू महाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिरामार्गे पुन्हा महाद्वार असा नगरप्रदक्षिणेचा मार्ग असेल. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातही अष्टमीच्या जागराची तयारी पूर्ण झाली आहे. दिवसभर मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे.   

दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. नारसिंही किंवा भद्रकाली नावाने ओळखली जाणारी ही देवता शरभेश्‍वर शिवाची शक्ती. काळ्या विद्येचे निराकरण करणारी म्हणून प्रत्यंगिरा, असे या पूजेचे माहात्म्य असल्याचे श्रीपूजक सारंग मुनीश्‍वर, स्वानंद मुनीश्‍वर, माधव मुनीश्‍वर यांनी सांगितले. शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने भवानी मातेच्या जागरानिमित्त बुधवारी (ता. १७) रात्री आठ वाजता आतषबाजी होणार आहे. 

हुल्लडबाज तरुण
मंदिरात रात्री पालखीला येणाऱ्या तरुणांत हुल्लडबाज तरुणांची संख्या वाढू लागली आहे. जाणीवपूर्वक एकमेकांना ढकलणे, फुले मारणे, महिला व मुलींच्या छेडछाडीचे प्रकार होत असून हुल्लडबाज तरुणांवर कारवाईची मागणी महिला भाविकांकडून होत आहे.

सहा तोळ्यांचा हार 
पुण्याचे भाविक मनीष झेंडे यांनी अंबाबाईला सहा तोळे सोन्याचा हार अर्पण केला. झेंडे दरवर्षी नवरात्रोत्सवात न चुकता देवीच्या दर्शनाला येतात. दर्शनाला येताना देवीला मौल्यवान दागिना अर्पण करण्याची परंपरा त्यांनी यंदाही जपली. 

शुक्रवारी रक्तदान शिबिर
नवरात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्त श्रीपूजक मंडळ आणि व्हाईट आर्मी यांच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) भव्य रक्तदान शिबिर होणार आहे. मंदिर परिसरातील दक्षिण दरवाजा येथे सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत शिबिर होणार आहे, अशी माहिती माधव मुनीश्वर, केदार मुनीश्वर, अशोक रोकडे यांनी दिली. 

घटांचे पाण्यात विसर्जन करू नका
शारदीय नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने घरोघरी घटस्थापना केली जाते. नऊ दिवस हे घट पूजन करून ते नंतर नदी, तलाव, विहिरीत विसर्जित केले जातात. घट जलस्रोतांत विसर्जित न करता, त्याची माती झाडांच्या मुळाशी घालून पर्यावरणाला हातभार लावावा, असे आवाहन निसर्गप्रेमी संघटनांच्या वतीने हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com