esakal | आज सावलीही साथ सोडणार 
sakal

बोलून बातमी शोधा

today is zero shadow day

असं म्हणतात की आपली सावली कायम सोबत असते. मात्र वर्षात असा दिवसही येतो की त्या दिवशी आपली सावलीही साथ सोडते. "तो दिवस' उद्या गुरुवारी (ता. 7) आला आहे.

आज सावलीही साथ सोडणार 

sakal_logo
By
प्रा. संतोष माने

असं म्हणतात की आपली सावली कायम सोबत असते. मात्र वर्षात असा दिवसही येतो की त्या दिवशी आपली सावलीही साथ सोडते. "तो दिवस' उद्या गुरुवारी (ता. 7) आला आहे. माणसाची सावली अदृश होण्याच्या या प्रकाराला वैज्ञानिक भाषेत "शून्य सावली दिवस' असे म्हटले जाते. आपलीच सावली अदृश झाल्याचा अनुभव या दिवशीच दुपारी 12 वाजून 28 मिनिटांनी सांगलीकरांना घेता येणार आहे. सूर्य बरोबर डोक्‍यावर आल्यानंतर काही मिनिटांसाठी आपली सावली अदृश झाल्याचे अनुभवता येणार आहे. 

निसर्ग आणि भूगोलातील काही घडामोडींमुळे सावलीही आपली पाठ सोडणार असल्याचा वैज्ञानिक अनुभव सांगलीकरांना गुरुवारी मध्यान्ही म्हणजे ठीक 12 वाजून 28 मिनिटांनी घेता येणार आहे. सूर्य डोक्‍यावर येताच आपली सावली पायाखाली पडते आणि काही वेळ गायब होते. अशी स्थिती काही ठरावीक दिवसांमध्येच निर्माण होते. पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधी डोक्‍यावर येत नाही. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य माध्यान्हाच्या वेळेस बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवायला मिळतो.

जेव्हा सूर्य बरोबर डोक्‍यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. सध्या उत्तरायण सुरू असून मे महिना असल्याने उन्हाळा चालू आहे त्यामुळे ही घटना पाहता येणार आहे. 21 जून नंतर दक्षिनायन सुरू झाल्यावर परत एकदा जुलै, ऑगस्ट महिन्यात डोक्‍यावर सूर्य येतो. परंतु त्यावेळी आपल्याकडे पावसाळा असतो. त्यामुळे ही घटना पाहता येत नाही. 

पृथ्वी स्वतःभोवती परिभ्रमण करत असताना ती सूर्याभोवतीही फिरते. पृथ्वीचा परिभ्रमण अक्ष 23.5 अंशांनी कललेला आहे. त्यामुळेच पृथ्वी परिभ्रमण करताना सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायण होते. एखाद्या अक्षांशावर सूर्याचा कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जुळते आणि शून्य सावली अनुभवता येतो. हे दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात. सांगली जिल्ह्यात विविध तालुक्‍यांमध्ये या शून्य सावली दिवस या वैज्ञानिक घटनेचा अनुभव 7 मे ते 9 मे या कालावधीत घेता येणार आहे. 

जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरातील शून्य सावली दिवस 

  • 7 मे रोजी सांगली, मिरज, तासगाव या शहरांमध्ये दुपारी 12:28 मिनिटांनी तर वाळवा-12:29, कवठेमहांकाळ -12:27, शिराळा-12:30 या वेळेत शून्य सावली अनुभवता येईल. 
  • 8 मे रोजी जत- 12:25, पलूस 12:28, खानापूर- 12:27 आणि कडेगाव- 12:29 या वेळेत शून्य सावली असणार आहे. 
  • 9 मे रोजी आटपाडीत 12:26 वाजता शून्य सावली असेल. 

घरांच्या छतावर शून्य सावलीचा अनुभव घेता येईल

आपापल्या शहरात शून्य सावलीचा अनुभव जरूर घ्या. दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास सूर्य डोक्‍यावर आल्यानंतर सांगलीकरांनी आपली सावली पायाखाली येतानाचे निरीक्षण करण्यासाठी रस्त्यांप्रमाणेच मैदाने, क्रीडांगणे, घरांच्या छतावर नागरिकांना सोशल डिस्टनसिंग पाळून शून्य सावलीचा अनुभव घेता येईल. 
 

loading image