शौचालय नसताना गावाला बक्षीस!

रविकांत बेलोशे
गुरुवार, 17 मे 2018

भिलार - राज्यात कागदोपत्री का होईना, ‘हागणदारीमुक्त गाव’ योजना यशस्वी झाल्याचा डंका पिटला जात आहे. मात्र, जावळी तालुक्‍यातील रुईघरमधील १८ उंबऱ्याच्या सनासाळी वस्तीत आज एकही शौचालय नाही. त्यामुळे या गावाने शासनाचे प्रोत्साहनपर बक्षीस घेतले कसे, असा सवाल सनासाळी ग्रामस्थ करत आहेत. 

भिलार - राज्यात कागदोपत्री का होईना, ‘हागणदारीमुक्त गाव’ योजना यशस्वी झाल्याचा डंका पिटला जात आहे. मात्र, जावळी तालुक्‍यातील रुईघरमधील १८ उंबऱ्याच्या सनासाळी वस्तीत आज एकही शौचालय नाही. त्यामुळे या गावाने शासनाचे प्रोत्साहनपर बक्षीस घेतले कसे, असा सवाल सनासाळी ग्रामस्थ करत आहेत. 

ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याच्या घोषणा शासन करीत असताना सनासाळी मात्र याला अपवाद आहे. पाचगणीपासून हाकेच्या अंतरावर असणारे रुईघर हे गाव रुईघर, सनासाळी, गणेशपेठ अशा तीन विभागांत दुर्गम डोंगरदऱ्यात वसलेले आहे. सनासाळी वस्ती भिलार धबधब्याच्या पायथ्याला आहे. या वस्तीकडून ग्रामपंचायत कर घेते, नेतेमंडळी निवडणुकीत मतदान करवून घेतात. परंतु, वस्तीला सेवासुविधा देताना ग्रामपंचायत आणि नेतेमंडळी हात आखडता घेतात. त्यामुळे येथील जनतेच्या नशिबी हालअपेष्टा आणि आदिवासींचे जीणे आले आहे. या कुटुंबांना पिण्यासाठी झऱ्याचा आधार शोधावा लागतो. दळणवळणासाठी रस्ता नाही. रस्ता नसल्याने मुलांनाही शाळेपासून वंचित राहावे लागते. रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत. या लोकांना उघड्यावर शौचास जावे लागते. दळणवळणाची सोय नाही. बांधकाम साहित्यही नेता येत नाही.

ग्रामस्थांनी शौचालयाचे भांडे, इतर साहित्य डोक्‍यावरून नेऊन ठेवले. बांधकाम साहित्य पोचत नसल्यामुळे ते सामान अडगळीत पडून आहे.

गावातीलच १८ कुटुंबांना एकही शौचालय नाही, मग रुईघर गाव हागणदारीमुक्त म्हणून पारितोषिकप्राप्त झालेच कसे, हाच प्रश्‍न आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती निवडणुकीवेळी येथील एका उमेदवाराने शौचालयासाठी पत्र्याचे तात्पुरते शेड उभे करून कागदपत्रे सादर करून निवडणूक लढली आहे. सनासाळीत एकही शौचालय नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ग्रामीण महाराष्ट्र शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर कसे केले, हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

रस्त्याअभावी आम्ही आमचे सगेसोयरे गमावले आहेत. शासकीय रस्ता नसल्याने आम्हाला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 
- मारुती शेडगे, ग्रामस्थ

Web Title: toilet village prize