दर नसल्याने टोमॅटो उकिरड्यात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

कऱ्हाड - दर गडगडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कमी कालावधीत चार पैसे मिळतील या आशेने अनेकांनी घेतलेल्या या पिकाला मातीमोल दर मिळत असल्याने घातलेला खर्चही शेतकऱ्यांच्या अंगावर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो उकिरड्यात फेकण्याची वेळ आली आहे. 

केवळ तीन ते चार महिन्यांत खर्चापेक्षा जादा पैसे मिळतील, या हेतूने शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले. त्यासाठी अनेकांनी बॅंका, पतसंस्था, हातउसने पैसे घेऊन त्यातून पीक वाढवले. मध्यंतरी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानेही काही ठिकाणी टोमॅटोचे नुकसान झाले. त्यानंतर बाजारपेठेत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर गडगडले आहेत. सध्या दहा किलोचा दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत खाली आला आहे. केवळ साडेतीन ते चार रुपये किलोने टोमॅटो विकावे लागत असल्याने वाहतूक खर्चही त्यातून निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या तोट्यात आले आहेत. घातलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. बाजारात नेण्याचे वाहतूक भाडेही परवडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी जनावरांपुढे टोमॅटो ओतली आहेत. तर काही शेतकऱ्यांनी ती उकिरड्यावर फेकून दिली आहेत. 

टोमॅटोचे पीक घेण्यासाठी कर्जही काढले. आता टोमॅटोला दरच नसल्याने उत्पादन खर्चही अंगावर आला आहे. दर नसल्याने बाजारात टोमॅटो नेणेही परवडत नाही. टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.
- सतीश झोंबाडे, शेतकरी, दक्षिण तांबवे   

Web Title: tomato rate decrease

टॅग्स