कार्यालयाच्या आवारात सामूहिक आत्मदहन करु ; बेळगावात शेतकऱ्यांनी दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

त्यामुळे, पुन्हा रस्ता करण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा कार्यालयाच्या आवारात सामूहिक आत्मदहन करण्यात येईल

बेळगाव : न्यायालयाने हलगा-मच्छे बायपास बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे, पुन्हा रस्ता करण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा कार्यालयाच्या आवारात सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. 

वडगाव, शहापूर भागातील शेतकरी व रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. कोणत्याही शहरातील झीरो किलोमीटरचा पॉईंट एकदा गृहीत धरला तर तो कधीच बदलता येत नाही. पण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व शासनाने वाहनांची वाढती संख्या पाहून बायपास करण्यासाठी पुणे-बंगळूर महामार्गावरील अलारवाड पुलाजवळ झीरो किलोमीटरचे मुख्य ठिकाण ठरविले. तिथून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून हलगा-मच्छे बायपास करण्याचा घाट घातला आहे.

हेही वाचा - शेतकरी संतप्त: पेटलेला ऊस टाकला पालिकेसमोरच -

याबाबत शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन १२ डिसेंबर रोजी बायपासला स्थगिती मिळवली आहे. तरीही ठेकेदाराने न्यायालयाच्या स्थगितीचा अवमान करत काम सुरु केले होते; मात्र शेतकऱ्यांनी हे काम बंद केले आहे. आता तर उच्च न्यायालयानेही हे काम बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, बायपासचा हट्ट सोडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी करण्यात आली. मात्र, पुन्हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला तर कार्यालयातच सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दिला. 

यावेळी शहर रयत संघटना अध्यक्ष हणमंत बाळेकुंद्री, कार्याध्यक्ष भोमेश बिर्जे, मोनाप्पा बाळेकुंद्री, अनिल अनगोळकर, सुभाष चौगले, सुरेश मऱ्याक्काचे, नितीन पैलवानाचे, तानाजी हालगेकर, मनोहर कंग्राळकर, भैरु कंग्राळकर, विठ्ठल बाळेकुंद्री, विनायक हलगेकर, महेश चतूर, कृष्णाबाई बिर्जे, रेणुका बाळेकुंद्री, सुरेखा बाळेकुंद्री, सविता बिर्जे, मालू बाळेकूंद्री, गीता बाळेकुंद्री यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा -  भडगावजवळील  घटना;  उसाने भरलेली चालती ट्रॉली दुचाकीस्वारावर कोसळली लिपिक जागेवरच ठार -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on the topic of bypass road the farmers warning to officers in belgaum