जिल्हा बँकेसमोर थकबाकी वसुलीचे खडतर आव्हान 

तात्या लांडगे 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सोलापूर: शेतकऱ्यांसह बिगरशेती संस्थांकडे वाढलेल्या थकबाकीमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आता खडतर वाटेवरून प्रवास करावा लागत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे बँकेची वाढलेली थकबाकी आणि सरकारची धोरणे ही आहेत. जिल्हा बँकेच्या 35 शाखांकडे तब्बल 741 कोटी तर 24 बिगरशेती संस्थांकडे 520 कोटींची थकबाकी आहे. सद्यःस्थितीत त्याची वसुली ठप्प असल्याने बँक अडचणीत सापडली आहे. 

यशाच्या शिखरावर पोचलेल्या आणि 100 वर्षे पूर्ण केलेल्या तसेच शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यात व जिल्ह्यातील साखर कारखानदारी वाढविण्यात महत्त्वाचा वाटा जिल्हा बँकेचा राहिला आहे. सहकाराच्या तत्त्वानुसार सोलापूर जिल्हा बँकेची वाटचाल मागील 60-70 वर्षांपासून सुरूही होती. परंतु, गत 10-15 वर्षांत बँकेच्या काही संचालकांनीच स्वत:च्या अथवा त्यांच्याशी संबंधित संस्थांसाठी तारण मालमत्तेच्या मूल्यांकनापेक्षाही अधिक प्रमाणात कर्ज घेतले. योगायोगाने त्या संस्था अल्पावधीतच अडचणीत आल्या. पर्यायाने त्यांच्याकडे बँकेची थकबाकी वाढली आणि तेथून बँकेची खडतर वाटचाल सुरू झाली. परंतु, गावगाडा सुधारण्याकरिता बँकेला पुन्हा पुनर्वैभवाची गरज असून त्यासाठी राजकीय मतभेद बाजूला सारून सर्वांनी एकत्रित येण्याची गरज निर्माण झालीय.

जिल्हा बँकेला पुनर्वैभव प्राप्त करण्याकरिता थकीत बिगरशेती संस्था आणि शेतकऱ्यांकडील थकबाकी वसुलीसाठी ठोस नियोजन केले जाईल. प्रसंगी कठोर निर्णयही घेतले जातील.
 
- अविनाश देशमुख, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बँक 

बँक अडचणीची प्रमुख कारणे...
 
- प्रती कर्मचाऱ्यांचा व्यवसाय अन्य बॅंकांच्या तुलनेत अत्यल्प
 
- 24 बिगरशेती संस्थांकडील थकबाकी मागील सहा-सात वर्षांपासून ठप्प 

- दुष्काळी परिस्थितीत सरसकट थकबाकी वसुलीला शासनाकडून स्थगिती 

- कर्जमाफीच्या विलंबामुळे सध्या संपूर्ण थकबाकी वसुली ठप्प 

- बिगरशेती संस्थांची थकबाकी अन्‌ मालमत्तांच्या मूल्यांकनात मोठी तफावत 

- बिगरशेती संस्थांकडून बॅंकेच्या थकबाकी वसुलीला न्यायालयात आव्हान

Web Title: A tough challenge for recovery in District Bank