#Tourism राधानगरी धरण निळेशार पाणी, गर्द हिरवाकंच परिसर

राजू पाटील
बुधवार, 26 डिसेंबर 2018

राशिवडे बुद्रुक - राजर्षी शाहू महाराजांनी फेजिवडेच्या माळावर धरणाची निर्मिती केली, तेव्हा वसवलेल्या वसाहतीचं आज ‘राधानगरी’ शहर बनलं. महाराजांच्या कन्या ‘राधाबाई’ यांच्या नावावरून या गावाला राधानगरी नाव दिलं. आज हे नाव जगाच्या नकाशावर आहे, ते ऐतिहासिक लक्ष्मी तलाव आणि दाजीपूर अभयारण्यामुळे. 

राशिवडे बुद्रुक - राजर्षी शाहू महाराजांनी फेजिवडेच्या माळावर धरणाची निर्मिती केली, तेव्हा वसवलेल्या वसाहतीचं आज ‘राधानगरी’ शहर बनलं. महाराजांच्या कन्या ‘राधाबाई’ यांच्या नावावरून या गावाला राधानगरी नाव दिलं. आज हे नाव जगाच्या नकाशावर आहे, ते ऐतिहासिक लक्ष्मी तलाव आणि दाजीपूर अभयारण्यामुळे. 

‘येथे यावे आणि रुळावं’ असंच इथलं वातावरण आहे. सभोवती लपलेली अनेक पर्यटनस्थळे आहेत, की ज्यांना पाहिले की अचंबित व्हायला होते. हत्तीमहल, जलाशयातील बेनगिरी बंगला, तलावाच्या पायथ्याचे ऐतिहासिक वीजगृह आणि शंभरी ओलांडलेले धरण, त्याचे स्वयंचलित दरवाजे. त्यांना पाहताना भान हरपून जायला होतं. 

फुलपाखरू उद्यान
वन्यजीव कार्यालयाच्या आवारात याची नुकतीच निर्मिती केली आहे. बगीचा, फुलपाखरांसाठी फुलणारी फुलझाडांची लागवड केली आहे. बाजूलाच फुलपाखरांचे उत्पत्तीकेंद्र आहे. त्याच्याच बाजूला माहिती केंद्र असून, तीत मुंगी-वाळवीपासून ते गव्यापर्यंत, नेचे-आर्किडपासून ते महाकाय झाडांपर्यंत माहिती मिळते.

महाराजांची विशेष मर्जी असलेला हा परिसर. प्रत्येक ठिकाणी त्यांचे पदस्पर्श झालेले. सव्वाशे वर्षांच्या उंबरठ्यावर असलेले हे धरण आजही भक्कमतेची साक्ष देते. पूर्ण दगडी बांधकाम आणि देशातील पहिले मोठे धरण आज मॉडेल म्हणून दिमाखात उभे आहे. मागे भक्कमपणे उभा असलेल्या अभयारण्याचा गारवा निळाशार पाण्यावरून स्पर्श करीत अंगावर घेण्याची मजाच न्यारी वाटते. तीच स्थिती धरणाला लागून असलेल्या स्वयंचलित दरवाजाच्या परिसराची. हे अचंबित करणारे दरवाजे उघडतात कसे, याचंही कोडं इथे आल्यावर पडते. धरणावरून पाण्याकडे पाहताना मधोमध असलेल्या बेटावर एक टुमदार बंगला लक्ष वेधतो. तो बेनगिरी बंगला. धरणाच्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी याची उभारणी झाली. धरणातील पाणी पूर्ण संपले की राऊतवाडीच्या बाजूने त्याला पाहण्यासाठी गर्दी होते. परंतु, हा योग क्वचितच येतो. 

यावर जाण्यासाठी बोटिंगची सोय प्रस्तावित आहे. या धरणाच्या पायथ्याला वीजगृहाची वास्तू जिल्ह्याच्या विकासातील एक क्रांतिकारी वास्तू म्हणून उभी आहे. त्या काळी युरोपहून आणलेले तीन कॉपरची जनित्रे आजही ताकदीने काम करताहेत. मात्र, त्यांना विश्रांती दिली आहे. त्याच्याच समोर शाहूंच्या कर्तृत्वाचा इतिहास सांगणारे शाहू स्मारक आकारास येत आहे. 
राधानगरीपासून तीन किलोमीटरवर हत्तीमहल लागतो. आत गेल्यानंतर पडक्‍या अवस्थेतील तरीही भक्‍कम अशी ही इमारत पूर्वी संस्थानचे हत्ती निसर्गाशी एकरूप व्हावेत, म्हणून शाहूंनी याची निर्मिती केली.

आमच्या हत्तीमहल येथील कार्यालयात माहितीचा खजिना आहे. विद्यार्थ्यांसाठी माहिती केंद्र उपयुक्त ठरतेय. फुलपाखरू उद्यानामुळे यात आणखी बहर येणार आहे. परवानगीशिवाय जाण्याचे कुणी धाडस करू नये.
- राजेंद्र धुमाळ,
वनक्षेत्रपाल, राधानगरी

पावसाळ्यात धरणाच्या उजव्या बाजूला रामणवाडी आणि डाव्या बाजूला राऊतवाडीचे धबधबे कोसळतात. यांचा विकास वेगाने सुरू आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी हा परिसर पार्क करण्यासाठी निधी दिला आहे. याच मार्गावर पडळीच्या माळाला वन्यजीव खात्याने टेहळणी मनोरा उभारला आहे. त्यावरून राधानगरी धरणाचे पाणलोट क्षेत्र पाहताना मन हरवून जाते. हत्तीमहालच्या मागे राधानगरी अभयारण्याचे कार्यालय आहे. येथे अभयारण्यातील जीवसृष्टीची माहिती सचित्र रूपात पाहायला मिळते. 

कसे याल..?
कोल्हापूर, निपाणी, गारगोटी, गोवा, कोकणातून थेट राधानगरीला एसटी सेवा आहे. ही सर्व स्थळं पाहण्यासाठी स्थानिकच्या गाड्या भाड्याने मिळतात.

दूध आमटी...
राहण्याची व जेवणाची येथे उत्तम सोय आहे. अनेक खासगी रिसॉर्ट व हॉटेलमधून सेवा मिळते. जेवणात शाकाहारी, मांसाहारी व मासेही मिळतात. येथे दुधापासून तयार केलेली दूध आमटी प्रसिद्ध आहे. 

Web Title: Tourism spot Radhanagri Dam special