पंढरपुरात उभारले नवीन प्रेक्षणीय स्थळ

pandharpur
pandharpur

पंढरपूर : श्री विठ्ठलाची 25 फूट उंचीची भव्य मूर्ती, विविध संतांच्या मूर्ती असलेल्या संतकुटी, 23 संतांच्या जीवनावर आधारित आकर्षक भित्तिचित्रे, रंगीबेरंगी फुले , विविध प्रकारच्या तुळशी, मनमोहक  कारंजे आणि अंफी थिएटर असलेल्या तुळशी वृंदावन या नव्या प्रेक्षणीय स्थळाची राज्याच्या वनविभागाने येथे निर्मिती केली आहे. येथील यमाई तलावाच्या काठावर सुमारे चार कोटी 25 लाख रुपये खर्च करून हे तुळशी वृंदावन तयार करण्यात आली असून लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे. यामुळे पंढरपुरातील प्रेक्षणीय स्थळात एक नवी आकर्षक भर पडली आहे.

रेल्वे स्थानकापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या नवीन तुळशीवृंदावन प्रकल्पामुळे पंढरीच्या वैभवात भर पडली आहे. अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला आहे. पंढरीत येणाऱ्या वारकरी आणि पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी असे हे प्रेक्षणीय स्थळ झाले आहे.

श्री विठ्ठलाला तुळशी प्रिय आहेत त्यामुळे पंढरपुरात तुळशी वन उद्यान असले पाहिजे या भावनेने वनमंत्री श्री मुनगंटीवार यांनी राज्याच्या वन विभागामार्फत तुळशी वृंदावन उभारण्यात येईल असे जाहीर केले होते. पंढरपूर रेल्वे स्थानकापासून चालत अवघ्या दहा मिनिटात या ठिकाणी पोहोचता येते.

आषाढी ,कार्तिकी, चैत्री आणि माघी या चार यात्रांच्या वेळी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांना गर्दीमुळे मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही. अनेक वारकरी मंदिराच्या शिखराचे दर्शन घेऊन समाधान मानतात आणि पुन्हा आपल्या गावी परत जातात अशा भाविकांना पंढरपुरात साकारलेल्या या तुळशी वृंदावनात उभारलेल्या श्री विठ्ठला च्या भव्य मूर्तीचे सहजतेने दर्शन घेता येणार आहे.

श्री विठ्ठलाची सुमारे 25 फूट उंचीची मूर्ती तसेच विविध संतांच्या 8 संतकुटी,  भित्तिचित्रांच्या माध्यमातून 23 संतांच्या जीवनावर आधारित साकारलेला संतांचा जीवनपट, मध्यभागी सुंदर कारंजे, विविध रंगीबेरंगी आकर्षक फुले , सुंदर प्रकाश व्यवस्था यामुळे हे तुळशीवृंदावन अतिशय देखणे झाले आहे. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी येथील  भित्तिचित्रे रेखाटली आहेत.

पंढरपूर मधील प्रेक्षणीय स्थळ म्हणून वारकरी आणि पर्यटकांनी देखील या ठिकाणी भेट द्यावी या हेतूने यमाई तलावाच्या काठी या तुळशी वृंदावन उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

तिथे एकाच वेळी 486 लोक बसू शकतील अशी आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या ठिकाणची सर्व कामे जवळजवळ पूर्ण झाली असून लवकरच या तुळशी वृंदावन प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे. 

पंढरपुरातील संत कैकाडी महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत गजानन महाराज मठ, गोपाळपुर आणि विष्णुपद या ठिकाणी वारकरी आणि पर्यटक भेट देत असतात. तुळशी वृंदावन प्रकल्पामुळे आता पंढरपुरातील प्रेक्षणीय स्थळात आता आणखी एक नवी भर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com