वाकीत पदभ्रमंती अन् किलच्यावर गिर्यारोहण

राजू पाटील
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

राशिवडे बुद्रूक - बहुराज्य प्रकल्प असलेल्या काळम्मावाडीच्या दुधगंगा प्रकल्पाचे पाणलोटक्षेत्र म्हणजेच ‘वाकी घोल’. जलाशयाच्या  मागे असलेला परिसर संवेदनशील अभयारण्य म्हणून संरक्षित आहे; परंतु याच्या कुशीत असलेले वाकोबा देवालय व त्याच्या देवराईचा परिसर, त्याच्या आसपासची गावे मनमुराद भटकंतीसाठी मस्तच आहेत. याच तालुक्‍यातील तुळशी जलाशयाच्या काठावरील ‘किलचा’ गिर्यारोहकांना चढाईसाठी निश्‍चिततच वेगळी अनुभूती देणारा आहे. 

राशिवडे बुद्रूक - बहुराज्य प्रकल्प असलेल्या काळम्मावाडीच्या दुधगंगा प्रकल्पाचे पाणलोटक्षेत्र म्हणजेच ‘वाकी घोल’. जलाशयाच्या  मागे असलेला परिसर संवेदनशील अभयारण्य म्हणून संरक्षित आहे; परंतु याच्या कुशीत असलेले वाकोबा देवालय व त्याच्या देवराईचा परिसर, त्याच्या आसपासची गावे मनमुराद भटकंतीसाठी मस्तच आहेत. याच तालुक्‍यातील तुळशी जलाशयाच्या काठावरील ‘किलचा’ गिर्यारोहकांना चढाईसाठी निश्‍चिततच वेगळी अनुभूती देणारा आहे. 

राधानगरीच्या अलीकडे तीन किलोमीटरवर मांजरखिंड लागते. येथूनच काळम्मावाडी धरणाकडे जायचे. येथून आठ किलोमीटरवर धरण आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकसाठी याची उभारणी. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प. प्रारंभी धरणाच्या पायथ्याला उभारलेला बगिचा आणि बालोद्यानामुळे जिल्हाच नव्हे, तर पश्‍चिम महाराष्ट्रात हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरले होते; मात्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे हे मिनी वृंदावन 
उद्‌ध्वस्त झाले आणि त्याला अवकळा आली.

धरणाच्या पायथ्यापासूनच राजापूरमार्गे वाकी घोलात जावे लागते. तिकडे जाताना धरणपायथ्याला वीजगृहाजवळ रस्त्याकडेचा मानवनिर्मित धबधबा थोपवून ठेवतो. पुढे वाकीच्या देवराईपर्यंत जाण्यासाठी पंधरा किलोमीटर जंगलातून आणि जलाशयाच्या काठाकाठाने जाणारा मार्ग. यात सात किलोमीटर मार्ग अभयारण्याच्या संवेदनशील परिसरात येत असल्याने कच्चा रस्त्याचा आहे. तो ओलांडून गावठाण, आडोली, सावर्दे परिसरात प्रवेश होतो.

याच मार्गावरून जाताना दुधगंगा जलाशयाच्या तुडुंब पाण्यावरून नजर हटत नाही, ती भिरभिरत असतानाच नजरेच्या टप्प्यात वाकीची देवराई पडते. गर्द आणि गच्च हिरवीगार देवराई आणि तिच्या मधोमध वाकोबाचे मंदिर दिवसभराचा शीण घालवते. येथे आणखीन एक लपलेले ऐतिहासिक स्मारक आहे. सावर्देपासून तीन एक किलोमीटरवर जंगलात असलेला ‘जिंजी महाल‘. या महालात छत्रपतींचे पुत्र राजाराम महाराजांचे काही काळ वास्तव्य होते. येथे या महालाचे केवळ अवशेष आहेत आणि एका दगडावर शिलालेख. हा परिसर भटकंतीसाठी उत्तम व प्रेरणादायी आहे; परंतु येताना वन्यजीव विभागाशी संपर्क साधल्यास अधिक सोईचे होते.

भटकंतीबरोबर लोकांना पर्वतचढाई करण्यास विशेष आवडते. राधानगरीकडे न जाता याच मार्गावरील भोगावती कारखान्यापासून सहा किलोमीटरवर शिरगाव फाटा लागतो. तिथूनच धामोडच्या तुळशी धरणावर जाता येते. या मुख्य रस्त्यावर हे धरण आहे. हा परिसरही मनोहारी आहे; तर त्याच्या बाजूला नव्याने झालेला लोंढा प्रकल्प लोकांना आकर्षित करत आहे. या दोन्ही तलावांच्या पश्‍चिमेला एक उंचच उंच सुळका आहे. त्यालाच ‘किलचा’ म्हणतात.

दूरवरून किल्ल्यासारखा दिसतो, म्हणून हा किलचा. याकडे जाण्याचा मार्ग या परिसरात कुणालाही विचारले तरी सांगतात. एक केळोशी, आपटाळमार्गे; तर दुसरा म्हासुर्लीच्या अलीकडून बाजारीच्या धनगरवाड्यावरून थेट त्याच्या पायथ्याला गेलेला. हा मार्ग साधारणतः बरा आहे. दोन्हींकडील बाजूंनी वर आले; तरी या किलच्यावर जाण्यासाठी एकच पायवाट आहे. 

किलचा म्हणजे कातळ
किलचा म्हणजे एक कातळ, चोहोबाजूंनी तासलेले कडे आणि मधोमध दोन-तीन एकर भरेल इतका सपाट भाग. आसपासच्या अर्धगोलात सर्वांत उंच असे हे शिखर; परंतु चढाईला अवघड. तरी गिर्यारोहकांना आवडेल असे आणि नवख्यांनाही नवलाईचे.

येथे असे यावे लागते
वाकी परिसरात जाण्यासाठी राधानगरीकडून वाहन मिळत नाही, खासगी वाहनाने जावे लागते. काळम्मावाडीतून पंधरा किलोमीटर; तर गारगोटीवरून तीस किलोमीटर. हा मार्ग सुलभ. तर किलच्याला जाण्यासाठी धामोडपर्यंत एसटी आहे. तिथून खासगी वाहनाने जावे लागते.

Web Title: Tourists spot in Kalammawadi Dam region