मेडिकल हबच्या दिशेने!

health
health

सांगलीच्या आरोग्य सेवेला सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आहे. इंग्रजांच्या काळात पहिली ओपन हार्ट सर्जरी झाल्याचा इतिहास आहे. मिरजेतील मिशन हॉस्पिटलला शतकोत्तर इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ते महाराष्ट्रातील अग्रगण्य हॉस्पिटल म्हणून ओळखले जात होते. आजही मिरजेत काही घराणी तीन-चार पिढ्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. 
सांगली-मिरजेची मेडिकल हबच्या दिशेनेच वाटचाल सुरू आहे.

तेव्हापासून आजवर सांगली-मिरजेची आरोग्य सेवा ही नेहमीच मुंबई-पुण्यानंतर उच्च दर्जाची राहिली आहे. आजही जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मोठ्या संख्येने आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील जवळपास सर्वच नवीन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज हॉस्पिटल सांगली, मिरजेत असल्याने पश्‍चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील रुग्ण उपचारासाठी या दोन शहरांमध्ये येतात. जिल्ह्यात आज अत्याधुनिक आयसीयू, सुसज्ज ओपीडी असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आता सांगली-मिरजेसह तालुक्‍याच्या ठिकाणीही होत आहेत. तेथे अनेक दुर्धर आजारांवर उपचार होत आहेत. त्यामुळे नागरिकांना आता पुण्या-मुंबईला जाण्याची गरज पडत नाही. मेंदू, किडनी, हार्ट, दंत, नेत्र, पोट, प्लास्टिक सर्जरी, ऑर्थोपेडिक अशा सर्व प्रकारच्या आजारावर आज या दोन्ही शहरांत आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असल्याने ही दोन्ही शहरे मेडिकल हबच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सांगलीत आता दुर्बिणीतून केल्या जाणाऱ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही होत असल्याने रुग्णांना चांगली सोय झाली आहे. हृदयावरील वेगवेगळ्या उपचारपद्धतीही येथे उपलब्ध असल्याने त्याचाही फायदा रुग्णांना होत आहे. सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल, भारती मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, मिशन हॉस्पिटल यांसह जिल्ह्यात सुमारे एक हजारहून अधिक हॉस्पिटल आहेत.

ॲलोपॅथीबरोबरच आयुर्वेद आणि होमिओपॅथीमधील वैद्यकीय व्यावसायिकही मोठ्या संख्येने आहेत. सांगलीत आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय असल्याने या शाखेतील उपचार पद्धतीही चांगल्या फोफावल्या आहेत. आयुर्वेद डॉक्‍टरांनीही चांगलाच जम बसवल्याचे दिसून येते. सांगली-मिरजेत नियमितपणे विविध विषयांवरील वैद्यकीय परिषदा होत आहेत. त्याचाही फायदा येथील डॉक्‍टरांना होताना दिसतो. 

शिवाय राजीव गांधी आरोग्य योजनेतही शहरातील सुमारे १७ हॉस्पिटल असल्याने त्याचाही फायदा होत आहे. गेल्या तीन वर्षात सुमारे ९५ कोटी रुपयांच्या चाळीस हजारावर शस्त्रक्रिया या योजनेंतर्गत करण्यात आल्या आहेत.

एकीकडे खासगी आरोग्य सुविधा चांगल्या जोमाने वाढत असताता शासकीय आरोग्य सुविधा मात्र संथ गतीने मिळत आहेत.  

शासनाची आरोग्य सेवा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. वेळेत उपचार न होणे, औषधे उपलब्ध नसणे, वैद्यकीय अधिकारी निवासी नसणे, सुविधा नसणे यासारख्या अनेक बाबींमुळे शासकीय आरोग्य यंत्रणेची असून अडचण नसून घोटाळा अशी अवस्था आहे. खरे तर आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यासाठी शासन सतत काही नवीन योजना आणत असते मात्र त्या ग्रामीण भागात तळागाळातील घटकांपर्यंत पोचत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

जिल्ह्यात आजघडीला ३२० उपकेंद्रे, ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १२ उपजिल्हा रुग्णालये आणि २ ग्रामीण रुग्णालये आहेत. याशिवाय सांगली आणि मिरजेत शासकीय रुग्णालय आहे. यातील वसंतदादा शासकीय रुग्णालय हे जिल्ह्याचे सर्वोपचार रुग्णालय म्हणून ओळखले जाते. आजही याठिकाणी सर्व विभाग अस्तित्वात असले तरी अत्याधुनिक सुविधांची वानवा आहे. सीटी स्कॅन यंत्रणा, डायलिसिस यंत्रणा, सक्षम हृदयरोग विभाग, मेंदू, किडनी या अवयवयांच्या आजारावरील उपचार होत नाहीत. ठराविक उपचारानंतर रुग्णाला खासगी रुग्णालयात घालवणे (पाठवणे नव्हे) असेच चालते हा अनुभव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो.

सांगली-मिरजेला मेडिकल हब म्हणून मान्यता मिळाली आहेच. मात्र या दोन्ही शहरांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने त्या पुरवण्याकडे लक्ष दिल्यास येथील वैद्यकीय व्यवसाय केवळ राज्यापुरता मर्यादित न राहता तो जगभरात लौकिकपात्र होईल अशी गुणवत्ता जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात आहे.

तज्ज्ञ म्हणतात
क्षयरोग, मलेरिया, डेंगीवरील प्रभावी उपचार सुविधा कोल्हापुरात आहेत; पण स्वच्छतेच्या अभावामुळे डासांची निर्मिती होते. त्यामुळे परिसर स्वच्छता हा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे भविष्यात घनकचरा व्यवस्थापनला महत्त्व देणे आवश्‍यक आहे. त्याबरोबर भटक्‍या मोकाट कुत्र्यांकडून घेतले जाणारे चावे ही गंभीर आहे. वरवर किरकोळ वाटणाऱ्या समस्येवरील उपचारांचा खर्च मोठा आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त गरजेचा आहे.
डॉ. हर्षदा वेदक

शासकीय रुग्णालयांत उपचाराला येताना अनेक रुग्णांना येथील कोंदटपणा नकोसा वाटतो. हे चित्र बदलण्यासाठी सीपीआरमधील वैद्यकीय सुविधा अधिक लोकाभिमुख केली आहे. समाजातील सर्वच स्तरांतील व्यक्तींना येथे उपचार घेता येतात. त्यामध्ये सीटीस्कॅन मशीन, हृदय शस्त्रक्रिया विभाग, आयसीयूमध्ये अत्याधुनिक मशीन बसविली आहेत. तसेच विभागालाही आलिशान लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. जयप्रकाश रामानंद

सांगलीत आज सुपर स्पेशालिटी तज्ज्ञांची संख्या चांगली आहे. दोन मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमुळे चांगले उपचार मिळतात. त्यामुळे सांगली, मिरजेची आज मेडिकल हब अशी ओळख झाली आहे. रस्ते, रेल्वेची सोय झाल्यास इतर राज्यांतील रुग्णही या ठिकाणी येऊ शकतील. महानगरांच्या तुलनेत येथील उच्च दर्जाचे उपचार स्वस्तात उपलब्ध असल्याने त्याचा फायदा मिळू शकतो.
डॉ. दिलीप मगदूम

किशोरवयीन मुलांमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक बदलांविषयी गोंधळाची स्थिती असते. त्यातून अनेक मुलांमध्ये निर्माण होणारा न्यूनगंड, भय किंवा लैंगिक माहितीचा अभाव यांतून भविष्यात मानसिक गुंतागुंतीची समस्या निर्माण होते. अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या दूर होण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन स्तरावर समुपदेशन गरजेचे आहे. त्यासाठी समुपदेशनाच्या कक्षा रुंदावाव्यात.
डॉ. पी. एम. चौगुले

जिल्हा परिषदेने गेल्या दीड वर्षांत आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. त्यामुळे आज प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे यांच्यात चांगल्या सुधारणा झाल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवण्यातही जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला. आता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नावीन्यपूर्ण योजनेतून कॅंटीन सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या केंद्रांचेही महत्त्व वाढेल.
गजानन कोठावळे 

कोकणात ५० टक्के रुग्ण व्यसनाधीनतेने बळी पडतात. तसेच कोकणातील स्त्रियांच्या आरोग्यावर किशोरवयापासून उपचार करण्याची आवश्‍यकता आहे. येथील किशोरवयीन मुली, नवविवाहिता, प्रौढा व वृद्ध महिलांच्या आरोग्याची स्थिती चिंताजनक आहे. त्याचे सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहिले तरच कोकणात २० वर्षांनंतरची सुदृढ पिढी निर्माण होईल. त्यातून कोकण समृद्ध बनेल.
डॉ. सुवर्णा पाटील

गरोदर माता मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात वाढते आहे. त्यासाठी गावोगावी स्त्री-रोगतज्ज्ञांमार्फत गरोदर महिलांची आरोग्य तपासणी व वेळोवेळी औषधोपचाराला भविष्यात प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री मातृत्व अभियान कोल्हापुरात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यातून जिल्ह्यातील गरोदर मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
डॉ. सत्‍येन ठोंबरे

सांगली, मिरज राज्यातील 
आधुनिक आरोग्य सेवा पुरवणारी प्रमुख केंद्रे आहेत. येथे सर्व आजारांवरील आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सुविधा व जवळपास सर्वच शाखांतील तज्ज्ञ उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नागरिकांना त्याचा फायदा होतो. शासनाने दळणवळणाच्या तसेच पायाभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या उपलब्ध करून दिल्यास येथील वैद्यकीय सुविधा आणखी उत्तम होतील.
डॉ. अनिल मडके

मरेपर्यंत गोळ्या, औषधे, इंजेक्‍शने घेत राहून सर्व रिपोर्टस्‌ नॉर्मल ठेवणे ही आजची आरोग्याची व्याख्या झाली आहे. उत्तम आरोग्य कशात दडले आहे हे वैद्य, डॉक्‍टर किंवा सामान्य नागरिकांना समजेनासे झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, संधिवात, थायरॉईड, पीसीओडीसारखे आजार जे अन्य चिकित्सा प्रणालीने कधीही बरे होणारे आहेत, त्यांना आयुषची चिकित्सा सुरू करण्यास कायदेशीर संमती द्यावी.
डॉ. सुविनय दामले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com