संस्कार संपले तर गावे उद्‌ध्वस्त होतील 

संस्कार संपले तर गावे उद्‌ध्वस्त होतील 

सांगली : गावे असुरक्षित झाली आहेत. डॉल्बीवर नाचणाऱ्या आणि व्हॉट्‌सऍपवर रात्रभर चॅटिंग करणाऱ्या मुलांना थांबविण्याची धमक राहिली नाही. नुसतेच अत्याधुनिक तंत्रज्ञान विकास करू शकत नाही. संस्कार संपले तर गावे उद्‌ध्वस्त होतील, असा इशारा देऊन गावचे गावपण आणि संस्कृती टिकवून ग्रामस्वराज्य आणायचे असेल, तर डॉ. पी. बी. पाटील यांचे "नवेगाव आंदोलन' गावागावातून सुरू होण्याची गरज आहे, असे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. 

प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्या वतीने आज जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते पोपटराव पवार यांना "कर्मयोगी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फोरमचे अध्यक्ष व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. एक लाख रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पवार म्हणाले, "मी अपघातानेच सरपंच झालो. सलगच्या दुष्काळाने गावातील दूध जाऊन त्या जागी दारू आली होती. पूर्वीच सुंदर जगणं जाऊन गाव बिघडले होते. मग माझ्या बालपणीचं गाव परत उभे करायचा निर्धार मी केला. जलसंधारणाचे काम छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांच्यापासून ते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील आणि आर. आर. पाटील यांच्यापर्यंत साऱ्या जागरूक नेत्यांनी केले होते. त्याचाच वारसा आम्ही चालवत आहोत.' 


1990 मध्ये कृषी आणि ग्रामविकासामध्ये फारकत झाली. शेतकरीही कधी संघटित झाला नाही. मुबलक पाऊस असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. प्राचार्य पी. बी. पाटील यांनी ग्रामस्वराज्याबाबत जे मुद्दे मांडले होते, ते अमलात आणले असते, तर चित्र वेगळे दिसले असते. आज हिवरे बाजारला भेट देणाऱ्यात तरुणाईचे प्रमाण अधिक आहे. तरुणाई बिघडत चालली आहे, असे न म्हणता ती स्वतंत्र विचाराने आणि नव्या दिशेने कार्यरत झाली आहे, हे लक्षात घ्यावे आणि त्यांना समजून घेऊन त्यांच्यापुढे आदर्श कार्यक्रम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी आज पावलापावलावर पदवी देणारी दुकाने सुरू असल्याची टीका करून शांतिनिकेतन लोकविद्यापीठात मात्र माणसांची आयुष्य घडविली जातात, अशी भावना व्यक्त केली. स्पर्धेच्या जगात माणसाच्या आयुष्याला दिशा देणारे केंद्र शांतिनिकेतनमध्ये सुरू व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com