सातारा : व्यापारी सुनील झंवरला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या त्याला सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील जेल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव : साताऱ्यातील व्यापारी सुनील लक्ष्मीनारायण झंवर मोका अंतर्गत गुन्ह्यात दोषी ठरल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. वनवासवाडी येथील शेत जमिनीबाबतचा न्यायालयीन वाद मिटवून घेण्यासाठी झंवरने पुसेगाव (ता. खटाव) येथील राजकुमार जाधव याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच 16 लाखांची खंडणीदेखील मागितली होती. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात 'मोका' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्यात व्यापारी सुनील झंवरचा सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांच्या विशेष पथकाने काल (ता.4) रात्री सातारा येथून झंवरला अटकेत घेतले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या त्याला सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील जेल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

सातारा शहरानजीकच्या वनवासवाडीमध्ये सर्जेराव दत्तू माने यांची शेतजमीन आहे. या जमिनीबाबत सुरू असलेला न्यायालयीन वाद मिटवून घेण्यासाठी गुंड दत्ता जाधवने साथीदारांसह माने यांच्यावर दबाब आणला होता. ऑक्टोबर 2017 मध्ये मंगेश चंद्रकांत सावंत याने माने यांचे मेहुणे राजकुमार जाधव (रा. पुसेगाव, ता. खटाव) यांना घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी केली होती. त्यानंतर 12-13 दिवसांनी दत्तात्रय उर्फ दत्ता रामचंद्र जाधव, चंद्रकांत विष्णू सावंत, मंगेश चंद्रकांत सावंत, प्रदीप धोंडीराम घाडगे, विजय उर्फ भेज्या भालचंद्र वाघमारे आणि खली उर्फ कृष्णा हणमंत बडेकर यांनी राजकुमार जाधव यांच्याकडे 16 लाख खंडणीची मागणी केली होती. तसेच अनेकदा समक्ष भेटून आणि फोनवरूनही जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ, दमदाटीही केली होती. 

याप्रकरणी राजकुमार जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पुसेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सर्वच संशयितांना 'मोका' लावण्यात आला आहे. त्यापैकी दत्तात्रय रामचंद्र जाधव, प्रदीप धोंडीराम घाडगे, विजय उर्फ भेज्या भालचंद्र वाघमारे व खली उर्फ कृष्णा हणमंत बडेकर यांना यापूर्वीच अटक झाली असून, सध्या ते कारागृहात आहेत. चंद्रकांत सावंत व मंगेश सावंत हे अद्याप फरारी असून त्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती तपास अधिकारी व सातारा ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड यांनी दिली. 

'मोका' दाखल झाल्याने या गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक गरुड यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान या गुन्ह्यामध्ये सातारा येथील व्यापारी सुनील लक्ष्मीनारायण झंवर याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार, झंवरला अटक करण्याचे निर्देश उपअधीक्षक सुहास गरुड यांनी दिले होते.

पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वजित घोडके, सातारा रोड दूरक्षेत्रचे सहायक निरीक्षक संतोष साळुंखे, हवालदार कमलाकर कुंभार, पोपट बिचुकले यांच्या पथकाने बुधवारी रात्री सातारा येथून सुनील झंवरला अटक केली. वैद्यकीय तपासणीवेळी अत्यवस्थ वाटत असल्याचे झंवरने सांगितल्यानंतर आरोग्य तपासणी करून त्याला सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील जेल वॉर्डमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुनील झंवरला मोक्का न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trader Sunil Zanwar arrested from Satara