सांगलीत जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा विरोध...संघटनांची बैठकीकडे पाठ; महापौरांसह पदाधिकाऱ्यांचे "कर्फ्यू'चे समर्थन 

बलराज पवार
Thursday, 10 September 2020

सांगली-  महापालिका क्षेत्रात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने केलेल्या जनता कर्फ्यूस व्यापारी संघटनांनी विरोध केल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जनता कर्फ्यूसंदर्भात महापालिकेतील आजच्या बैठकीकडे अनेक संघटनांनी पाठ फिरवली. भाजीपाला विक्रेते, फेरीवाला संघटना, डेअरी असोसिएशनने मात्र जनता कर्फ्यूला पाठिंबा दर्शवत कर्फ्यू कडक पाळला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. महापौर गीता सुतार यांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. 

सांगली-  महापालिका क्षेत्रात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने केलेल्या जनता कर्फ्यूस व्यापारी संघटनांनी विरोध केल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जनता कर्फ्यूसंदर्भात महापालिकेतील आजच्या बैठकीकडे अनेक संघटनांनी पाठ फिरवली. भाजीपाला विक्रेते, फेरीवाला संघटना, डेअरी असोसिएशनने मात्र जनता कर्फ्यूला पाठिंबा दर्शवत कर्फ्यू कडक पाळला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. महापौर गीता सुतार यांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. 

महापालिका क्षेत्रात शुक्रवारी ता. 11 ते 20 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्याबाबत चर्चा करण्यासाठी आज आयुक्त नितीन कापडणीस यांनी बैठक आयोजित केली होती. महापौर गीता सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपमहापौर आनंदा देवमाने, भाजपचे नेते शेखर इनामदार, स्थायी समिती सभापती संदीप आवटी, गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक उपस्थित होते. 

आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे. घरातून बाहेरही न पडलेल्यांना लागण झाली आहे. जनता कर्फ्यूमध्ये जनतेने स्वेच्छेने नियम पाळावेत, अशी अपेक्षा आहे. संघटनांनी ठरवले, तर ते होऊ शकते. स्वत:साठी नियम घातले तर समूह संसर्ग थांबेल. त्यामुळे जनता कर्फ्यू पाळण्याची गरज आहे. यामध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहतील, असे स्पष्ट केले. 
महाराष्ट्र व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा म्हणाले, बॅंका, शासकीय कार्यालये, बससेवा सुरू राहणार असेल, तर नागरिक बाहेर पडणार. त्यामुळे गर्दी होणारच. प्रशासनाचे नियम व्यापारी पाळतात. इतर ठिकाणी पाळले जात नाहीत. जनता कर्फ्यू लावून कोरोनाचे आक्रमण बंद होणार नाही. आम्ही जनता कर्फ्यू पाळणार नाही. त्याऐवजी टास्कफोर्सद्वारे जनतेला शिस्त लावावी. 

मिरज व्यापारी संघटनेचे विराज कोकणे म्हणाले, लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. नागरिक स्वयंशिस्त लावून घेणार नाहीत, तोवर कोरोना थांबणार नाही. महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण कमी होईपर्यंत बाजारपेठ सकाळी 9 ते दुपारी 4 सुरू ठेवावी. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी अमोल गोटखिंडे यांनी, जनता कर्फ्यू 10-15 दिवस करा; पण कडक करा. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपाययोजना करावी, असे मत व्यक्त केले. 

फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सुरेश टेंगले म्हणाले, जनता कर्फ्यू स्वागतार्ह आहे. तो स्वीकारला पाहिजे. फेरीवाल्यांना जनता कर्फ्यूमध्ये सहभागी करून घेऊ. 
हॉटेल संघटनेचे शैलेश पवार म्हणाले, आताच शासनाने हॉटेल सुरू करण्याची परवानगी दिल्याने त्यांची जनता कर्फ्यूची मानसिकता नाही. जनता कर्फ्यू प्रशासनाने ताब्यात घेऊन शंभर टक्के बंद करावा. 
मिरज सराफ असोसिएशनचे ओंकार शिखरे म्हणाले, किती दिवस बंद पाळणार? मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर ही जीवनशैली स्वीकारावी लागेल. 
नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे म्हणाल्या, व्यापारी, हॉटेल, फेरीवाले, हातगाडीवाले या सर्वांनी जनता कर्फ्यू पाळावा, अशी विनंती आहे. आम्ही नगरसेवक जनतेसाठी राबत आहोत. रस्त्यावरील भाजी विक्री बंद करावी आणि भाजी, फळे घरी पोहोचवण्याची सोय करावी, असे त्या म्हणाल्या. 

भाजीपाला विक्रेता संघटनेचे शंभोराज काटकर म्हणाले, आम्ही प्रशासनासोबत आहे. जनता कर्फ्यूमध्ये सहभागाची तयारी आहे.' डेअरी असोसिएशनचे चेतन गडदे म्हणाले, जनता कर्फ्यूला आम्ही पाठिंबा देऊ. दूध डेअरी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेतच सुरू ठेवू. 
या बैठकीस महापालिकेचे मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. यामध्ये विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित नव्हते. तसेच शहरातील विविध व्यावसायिक संघटनांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली. दरम्यान, बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""जनता कर्फ्यू पाळून काही फायदा होणार नाही. त्यामुळे आमची संघटना जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होणार नाही. 

कोरोना रोखणे प्रशासनाच्या हातात नाही-
आयुक्‍त नितीन कापडणीस म्हणाले, महापालिकेचे कर्मचारी गेले पाच महिने जीव धोक्‍यात घालून काम करत आहेत. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळावी. दहा दिवसांच्या जनता कर्फ्यूमुळे संसर्ग थांबेल, काही जीव वाचतील. कोरोना रोखणे प्रशासनाच्या हातात नाही, जनता कर्फ्यूला पाठिंबा द्यावा. रस्त्यावरचा तसेच आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय महासभेत घेऊ, असे ते म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traders oppose Sangli Janata Curfew. Back to the meeting of unions; Support for "curfew" of office bearers including mayors