गॅस गळतीमुळे तवंदी घाटातील ठप्प वाहतूक पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

निपाणी : कोचीनहून मुंबईकडे प्रोपोलीन गॅस घेऊन जाणाऱ्या टँकरवरील चालकाचा ताबा सुटून तो महामार्गावर उलटला. त्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात गॅसगळती सुरु झाली. अखेर गॅसगळती रोखण्यात यश आल्यानंतर रात्री दहानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

निपाणी - कोचीनहून मुंबईकडे प्रोपोलीन गॅस घेऊन जाणाऱ्या टॅंकरवरील चालकाचा ताबा सुटून तो महामार्गावर उलटला. त्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. स्फोट होण्यापासून खबरदारी घेत पोलिस, अग्निशामक दल आणि पुंजलॉईडच्या भरारी पथकाने महामार्गावरील वाहतूक बंद केली. तब्बल चार तास महामार्ग ठप्प झाला होता. आज सायंकाळी सहाच्या सुमारास तवंदी घाटातील दुसऱ्या वळणावर ही घटना घडली. अपघातात चालक रणजित सिंग (वय ४०, रा. पंजाब) व क्‍लीनर जितेंद्र बर्मा (३२, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हे जखमी झाले आहेत. त्यांना येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्‍यान रात्री दहा वाजता वाहतूक सुरू करण्यात आली.

याबाबत घटनास्थळासह पोलिसांतून मिळालेली माहिती अशी ः कोचीन येथून टॅंकर (एमएच ०९ एफयू ५३९६) गॅस भरून मुंबईकडे निघाला होता. तवंदी घाटातील दुसऱ्या वळणावर चालकाचा ताबा सुटून रस्त्यावरच टॅंकर उलटला. त्यामुळे टॅंकरमधून गॅस गळती सुरू झाली. अपघाताची माहिती समजताच पुंज लॉईडच्या भरारी पथकाने चालक, क्‍लीनरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून महामार्ग बंद केला. पाच किलोमीटर अंतरापर्यंत दोन्ही बाजूंकडे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सुमारे दोन तास गॅस गळती सुरूच होती. स्फोटाचा धोका टाळण्यासाठी अग्निशामक दलाकडून निपाणी, संकेश्‍वर व चिक्कोडी येथील वाहने तैनात केली होती. स्फोटाच्या भीतीने सर्वजण भयभीत झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत गॅस गळती सुरूच असल्याने वाहतूक ठप्पच होती. त्यामुळे तवंदी घाटात बेळगाव व कोल्हापूरच्या दिशेने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर बेळगावकडून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक संकेश्‍वर, चिक्कोडी, निपाणीमार्गे; तर कोल्हापूरहून बेळगावकडे जाणारी वाहतूक निपाणी, चिक्कोडी, संकेश्‍वरमार्गे वळविण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्यावरही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वेळी मंडल पोलिस निरीक्षक किशोर भरणी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बसगौडा पाटील व सहकारी महामार्गावर परिस्थितीवर नियंत्रणासाठी ठाण मांडून होते.

स्फोटाची भीती
महामार्गावर गॅस वाहतूक करणारा टॅंकर उलटून गॅस गळती झाल्याची या भागातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे स्फोटाच्या भीतीत संपूर्ण तवंदी घाट परिसर होता. केवळ दैव बलवतर म्हणूनच स्फोट न होता केवळ गॅसची गळती झाली. सुरक्षेचे उपाय म्हणून सर्व यंत्रणा घटनास्थळी सज्ज करण्यात आल्या होत्या. सायंकाळी सहापासून तवंदी, गवाण, शिप्पूर यासह महामार्गावरील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. विजेचा स्पार्क होऊन दुर्घटना घडू नये, म्हणून ही काळजी घेतल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The traffic on the highway was start