वाहतूक कोंडीने वैतागले ओगलेवाडीकर

ओगलेवाडी - राज्य मार्गावर जीव धोक्‍यात घालून एसटीची प्रतीक्षा करताना विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे..
ओगलेवाडी - राज्य मार्गावर जीव धोक्‍यात घालून एसटीची प्रतीक्षा करताना विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे..

ओगलेवाडी - कऱ्हाड-विटा रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले अतिक्रमण, वाढलेली बेसुमार झाडे-झुडपे, घाणीचे साम्राज्य, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी, वाहन पार्किंगचा अभाव आदी गंभीर समस्यांमुळे येथील आणि परिसरातील नागरिक वैतागले आहेत. येथून जाणारा मुख्य रस्ता हा कऱ्हाड-पंढरपूर-विजापूर राज्यमार्ग आहे. केंद्र सरकारने या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाची मान्यता दिली आहे. त्यामुळे या रस्त्याला वाढते महत्त्व असल्याने येथील समस्यांकडे महामार्ग प्राधिकरण व ग्रामपंचायत लक्ष देणार का, अशी विचारणा नागरिक करत आहेत.

गावाजवळ लवकरच कऱ्हाड-टेंभू-तासगाव महामार्ग होणार आहे. त्यासंबंधी शासनाचे सर्वेक्षण झाले आहे. कऱ्हाड रेल्वे स्थानक जंक्‍शन होण्याच्या मार्गावर आहे. महामार्गालगतच ६५० कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे भूकंप संशोधन केंद्र व विद्यापीठ होणार आहे. त्यामुळे वाढत्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न परिसरात भेडसावणार आहे. त्या दृष्टिकोनातून वाहतुकीचे नियोजन व आखणी करणे गरजेचे आहे. रस्त्याच्या एका बाजूने हजारमाची, डिचोली व बाबरमाचीकडे जाणारा रस्ता आहे. लागूनच बाजार भरतो. रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने रस्ता वाहतुकीस अपुरा पडत आहे. एकावेळी दोन वाहने नीट जावू शकत नाहीत. या रस्त्यावर शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हाच रस्ता पुढे ऐतिहासिक सदाशिवगडाकडे जातो. पुढे पुनर्वसन डिचोली गाव आहे. तेथील विद्यार्थ्यांना शाळेसाठी तीन किलोमीटर पायपीट करावी लागते. अतिक्रमणांमुळे रस्ता अपुरा पडत असल्याने डिचोलीची एसटी सेवा बंद झाली आहे. श्रावण महिन्यात सदाशिवगडावर जाण्यास भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी असते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस पार्ले, बनवडीकडे जाणारा मार्ग आहे. या रस्त्यावर टेंभू प्रकल्प कार्यालय, वीज वितरण कंपनीचे कार्यालय, औद्योगिक वसाहत आहे. तसेच रेल्वे माल वाहतूक धक्का आहे. या ठिकाणाहून साखर, धान्य, खते, सिमेंटची रोज २५ हजार टन मालाची वाहतूक होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com