शनिला लागली वाहनांची साडेसाती, सुट्ट्यांमुळे सगळेच आले दर्शनाला

Traffic jam at Saturnishanapur
Traffic jam at Saturnishanapur

सोनई : सलग सुट्या आणि अर्धी शनिअमावास्या यामुळे आज भाविकांची शनिदर्शनासाठी एकच झुंबड उडाली आहे. वाहनांच्या प्रचंड गर्दीने राहुरी ते शनिशिंगणापूर हा रस्ता दिवसभर वाहतुकीच्या कोंडीत अडकला होता. त्यामुळे हे पंचवीस किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी एका वाहनाला तब्बल तीन तास लागत होते. 

वर्षभरात शनिवारी एकही पूर्ण अमावास्या नसली, तरी आज सायंकाळी 7.02 वाजता सुरू झालेली अमावास्या व सलग सुट्यांमुळे शनिदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा ओघ सकाळी दहा वाजताच सुरू झाला.

अकरानंतर तर राहुरी फाटा ते शिंगणापूर या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पिंप्री अवघड, उंबरे, ब्राह्मणी, वंजारवाडी, यशवंतनगर व सोनईत अधिकच अडचण पाहण्यास मिळाली. पंचवीस किलोमीटरच्या प्रवासासाठी भाविकांना अडीच ते तीन तासांचा वेळ लागला. 

महिन्याच्या पहिल्या शनिवारी राहाता, कोल्हार, बाभळेश्वर, राहुरी व सोनईचे वाहतूक पोलिस व्यावसायिक भेटीसाठी येतात. आज संपूर्ण रस्ता वाहतूक कोंडीत अडकूनही एकाही पोलिस ठाण्याचे कर्मचारी रस्त्यावर फिरकले नाहीत. सामाजिक कार्यकर्ते व शालेय विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

मात्र, वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे वाहतूक कासवगतीने पुढे सरकत होती. रस्त्याचे अर्धवट राहिलेले कामही या वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरले. 
शनिशिंगणापुरात जिल्हा परिषद शाळा, पानसनाला पूल, शाखा परिसर व शिवांजली चौकातही दिवसभर वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली.

आज दिवसभरात अंदाजे तीन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. प्रचंड गर्दीमुळे दर्शनास एक ते दोन तास लागत होते. मंदिरातील दर्शनव्यवस्था सुरळीत असताना व रस्त्यावर मोठ्या अडचणी असतानाही पोलिस अधिकारी व कर्मचारी मंदिर परिसरातच घुटमळत होते. 

भाविकांची अडवणूक सुरूच! 
देवस्थान ट्रस्टने गावात "लटकू बंद'चा निर्णय घेतला असला, तरी अंजली, वात्सल्य, शनिराज, गोपी या वाहनतळांसमोर व शाखा परिसरात रस्ता अडवून भाविकांची अडवणूक सुरूच होती. वाघाडे वाहनतळासमोर तर दादागिरी करून वाहने वळविली जात होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com