कहर बेशिस्तीचा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

सातारा - पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे, तर पर्यायी रस्त्यांवर रुंदीकरण, दुरुस्तींची कामे सुरू असल्याने वाहनधारकांची सध्या दैना उडत आहे. त्यातच वाहतूक शाखेची क्रेन गेली तीन महिने बंद असल्याने वाहनांच्या पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी वाहनधारकांच्या बेशिस्तीचा कहर दिसत असल्याने ‘नको हा सातारा’ अशी म्हणण्याची वेळ येत आहे. 

सातारा - पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे, तर पर्यायी रस्त्यांवर रुंदीकरण, दुरुस्तींची कामे सुरू असल्याने वाहनधारकांची सध्या दैना उडत आहे. त्यातच वाहतूक शाखेची क्रेन गेली तीन महिने बंद असल्याने वाहनांच्या पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी वाहनधारकांच्या बेशिस्तीचा कहर दिसत असल्याने ‘नको हा सातारा’ अशी म्हणण्याची वेळ येत आहे. 

पोवई नाक्‍यावर शहरातील प्रमुख आठ रस्ते येत असून, तेथील वाहतूक सुकर करण्यासाठी सध्या ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. या कामामुळे कित्येक वर्षांनंतर सातारा शहराच्या विकासात भर पडणार आहे. वर्षभरापासून सुरू असलेले हे काम सध्या मध्यावर पोचले आहे. त्यामुळे पोवई नाक्‍यावरील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. केवळ शिक्षक बॅंकेकडून कऱ्हाड बाजूला येणारा रस्ता कार्यान्वित आहे. त्यामुळे इतर वाहतूक पूर्णपणे पर्यायी अंतर्गत रस्त्यांवरून सुरू आहे. त्यातच अतिक्रमणधारक काढता पाय घेत नसल्याने काही ठिकाणी रस्तेही अरुंद झाले आहेत. 

वाहतूक शाखेकडे असलेली टोइंग क्रेन तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या क्रेनची दहशत पूर्णपणे संपुष्टात आली आहे. पूर्वी वाहने पार्क करताना पार्किंग सुरू आहे की नाही, हे पाहिले तरी जात होते. आता मात्र, बिनधास्तपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जात आहेत. खरेदीसाठी आलेले ग्राहक तर दुकानासमोरच वाहने लावत असल्याने दोन्ही बाजूला वाहने उभी राहून, अरुंद रस्त्यावरून पुढे जाणारी वाहनेही जागीच उभी राहत आहेत. पोलिस मुख्यालय ते मनाली हॉटेल कॉर्नरच्या रस्त्यावर तर गॅरेजवाले चक्‍क रस्त्यावर वाहने लावून काम करत आहेत. पोवई नाक्‍यावरून लोणार गल्लीत जाणाऱ्या रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी राहत आहेत.

बेशिस्त कोठे कोठे... 
 पोवई नाका ते लोणार गल्ली रस्ता
 पंताचा गोट ते मनाली हॉटेल रस्ता
 खोडजाई मंदिर ते अजिंक्‍य कॉलनी
 पोस्ट ऑफिस ते सिव्हिल रस्ता
 पारंगे चौक ते सिव्हिल रस्ता
 मोती चौक ते सदाशिव पेठ
 मुनोत चौक ते खणआळी

दोन कोटींचा फटका 
शहर शाखेकडे तीन क्रेन होत्या. ऑक्‍टोबरपासून या क्रेन बंद आहेत. क्रेनद्वारे महिनाकाठी बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्यांवर १५०० कारवाया होत होत्या. त्यातून वाहतूक शाखेला सरासरी दोन कोटी रुपये मिळाले असते. पण, ते बुडाले असल्याची माहिती वाहतूक शाखेतून मिळाली.  

दोन टोइंग क्रेनसाठी रविवारपर्यंत निविदा मागविल्या आहेत. निविदांमध्ये नियमावलीत बदल केले असून, त्यातून पारदर्शकता येईल. तसेच तक्रारी कमी होतील.
- सुरेश घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सातारा

Web Title: Traffic parking Issue