अल्पवयीन भाचाला चालवायला दिली गाडी; मामाला 4 दिवस कारावास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मामाने 17 वर्षांच्या भाचाला वाहन चालविण्यास दिले. अल्पवयीन मुलांना वाहन चालिवण्यास देऊ नये. सोलापूर शहरात पहिल्यांदाच अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
- संतोष काणे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा

सोलापूर : सतरा वर्षांच्या अल्पवयीन भाचाला दुचाकी चालविण्यासाठी देणाऱ्या मामा राजेंद्र बाबूराव कांबळे (रा. छत्रपतीनगर, मजरेवाडी, सोलापूर) यास न्यायालयाने आज (गुरुवारी) चार दिवस साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सोलापूर शहरात अशा प्रकारची कारवाई आणि शिक्षा पहिल्यांदाच झाली आहे. 

अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्याने अनेक अपघात घडले आहेत. हे माहीत असनूही अनेक पालक मुला-मुलींना वाहन चालविण्यासाठी देतात. या प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी देणाऱ्या व्यक्तीवर खटला दाखल करण्यास सुरवात केली आहे. चार दिवसांपूर्वी महावीर चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष काणे आणि त्यांच्या पथकाने एका दुचाकीस्वार तरुणाला कारवाईसाठी थांबविले. त्या मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. वाहन मामाने दिल्याचे त्या मुलाने सांगितले. मुलाचा मामा राजेंद्र कांबळे याने मामीला सोडण्यासाठी दुचाकी दिली होती. या प्रकरणात मोटार वाहन कायद्यानुसार वाहनमालक कांबळेविरुद्ध खटला दाखल करण्यात आला. गुरुवारी न्यायालयाने गवंडी काम करणाऱ्या कांबळे यास चार दिवस साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

मामाने 17 वर्षांच्या भाचाला वाहन चालविण्यास दिले. अल्पवयीन मुलांना वाहन चालिवण्यास देऊ नये. सोलापूर शहरात पहिल्यांदाच अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
- संतोष काणे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा

Web Title: traffic police takes action boy without traffic licences punishment to vehicle owner