#KolhapurFloods भुदरगड तालुक्यात 'या' काही मार्गावर वाहतूक सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

गारगोटी - वेदगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे भुदरगड तालुक्‍यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. प्रमुख रस्ते बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कमी राहिल्याने पूर ओसरत आहे. गारगोटी - पाटगाव, महलवाडीमार्गे कूर - गारगोटी मार्गावरील वाहतूक सायंकाळी कमी पाण्यातून सुरू झाली. मात्र, गारगोटी - कूर प्रमुख मार्गावरील वाहतूक रस्त्यावर पाणी असल्याने बंद आहे.

गारगोटी - वेदगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे भुदरगड तालुक्‍यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. प्रमुख रस्ते बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कमी राहिल्याने पूर ओसरत आहे. गारगोटी - पाटगाव,  महलवाडीमार्गे कूर - गारगोटी मार्गावरील वाहतूक सायंकाळी कमी पाण्यातून सुरू झाली. मात्र, गारगोटी - कूर या प्रमुख मार्गावरील वाहतूक मडिलगे येथे रस्त्यावर पाणी असल्याने बंद आहे. 

दरम्यान गारगोटी गडहिग्लज मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. पण पांगिरे येथे पुल तुटल्याची घटना घडल्याने अवजड वाहतूक अद्यापही या रस्त्यावरून बंद आहे.

शेणगाव, पडखंबे येथे पावसाने व महापूराने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. भुदरगड तालुक्‍यात दोन आठवडे मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्‍यात 24 तासात सरासरी 110.20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाटगाव धरणातून सुमारे 3500 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वेदगंगा नदीवरील व ओढ्यावरील सर्वच बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. 

चिकोत्रा धरणात 94 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातून 1400 क्‍युसेकने पाणी विसर्ग होत आहे. चिकोत्रा धरणाच्या अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या गावांना कोणतीही पुर्वसूचना न देता पाणी सोडल्याने शेतकऱ्यांची जनावरे, नदीकाठच्या वीज पंप, पोल्ट्री फॉर्म वाहून गेले आहेत. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

तालुक्‍यातील गारगोटी, दिंडेवाडी, पिंपळगाव या मार्गावर तुरळक स्वरूपात वाहतूक सुरू राहिली. महालवाडी, म्हसवे, कुंभारवाडा सालपेवाडी मार्गावर तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू राहिली. महापुराच्या विळख्यामुळे व विजेअभावी तालुक्‍यातील नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित झालेल्या नाहीत. यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

महापुराचे पाणी ओसरू लागल्यामुळे गावागावात कचरा साचून राहिला आहे. अशा ठिकाणी जंतूनाशक पावडर फवारण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी व तहसीलदार अमोल कदम यांनी गटविकास अधिकारी माधुरी परीट यांना दिल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic started on some of these routes in Bhudargad taluka