तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

मांडकुली (ता. गगनबावडा) येथे पुराचे पाणी पुन्हा रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

वैभववाडी : मांडकुली (ता. गगनबावडा) येथे पुराचे पाणी पुन्हा रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापुर मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. मात्र गणेशविसर्जन करून निघालेले शेकडो चाकरमान्यांची वाहने रस्त्यात अडकली असून, त्यांना आता माघारी परतावे लागणार आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतुक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हयात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि विविध धरणांतून सोडण्यात आलेले पाणी यामुळे तेथील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झालेल्या वाढीचा फटका तळेरे-कोल्हापूर मार्गाला बसला आहे. या मार्गावरील मांडुकली (ता. गगनबावडा) येथे आज सकाळी पुन्हा पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. साधारणपणे दोन ते तीन फुट पाणी रस्त्यावर चढल्याने या मार्गावरील वाहतुक प्रशासनाने बंद केली आहे.

पोलिस प्रशासनाने वैभववाडीत वाहतूक बंद करण्यापुर्वीचे शेकडो वाहने कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. ही सर्व वाहने मांडकुली येथे जावून अडकली आहेत. पाणी ओसरण्याची शक्यता कमी असल्यामुळे या सर्व वाहनांना आता माघारी परतावे लागणार आहे. वैभववाडी पोलिसांनी संभाजी चौकात वाहने थांबवून ती फोंडाघाटमार्गे पाठविण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, ६ सप्टेंबरला देखील मांडकुली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आले होते.त्यानतंर आता पुन्हा पाणी रस्त्यावर आल्यामुळे गणेशोत्सवासाठी आलेल्या शेकडो चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास खडतर होण्याची शक्यता आहे.

करूळ घाटातील दरड हटविली
करूळ घाटात शनिवारी दुपारी दरड कोसळली होती. ही दरड हटवून बांधकाम विभागाने सांयकाळी एकेरी वाहतूक सुरू केली होती. सायकांळी उशिरा या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे सुरळीत करण्यात आली होती. मात्र मांडकुली येथे पाणी भरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic stop on Talere-Kolhapur road