कोल्हापूर - शहरातील चौक आणि रस्त्यांवर वाहतूककोंडीमुळे पादचारी, वाहनधारक अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. ही कोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिस नेमके करतात तरी काय? असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. बागल चौक ते पाच बंगला मार्ग.
कोल्हापूर - शहरातील चौक आणि रस्त्यांवर वाहतूककोंडीमुळे पादचारी, वाहनधारक अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. ही कोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिस नेमके करतात तरी काय? असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. बागल चौक ते पाच बंगला मार्ग.

कोंडीचं वाढलं दुखणं...

कोल्हापूर - शहरातील वाहतूक कोंडीतून वाट काढताना नागरिक हैराण होत आहेत. शहरातील कोणत्याही रस्त्यावर कधीही जा, वाहतुकीचा बोजवारा ठरलेलाच आहे. शहरातून जायचे म्हणजे कसरत करावी लागते, हे शहरवासीयांच्या अंगवळणी पडत आहे. कुठे सिग्नल बंद, तर कुठे बेशिस्त पार्किंग, कुठे वाहतूक पोलिसांकडील अपुरे मनुष्यबळ, तर काही ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांचे दुर्लक्ष. मोक्‍याच्या ठिकाणी अतिक्रमणांचा विळखा. यातूनच शहरातील वाहतूक कोंडीच्या दिवसेंदिवस अवघड बनत चाललेल्या या समस्येकडे प्रशासकीय पातळीवर अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

कोंडीची कारणे 
 शहरातील २४ पैकी ८ सिग्नल बंद 
 मुख्य रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंग 
 शहर वाहतूक शाखेकडील अपुरे मनुष्यबळ 
 वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन

जबाबदारी महानगरपालिकेची  
शहरतील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना पुरवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यासाठी विशेष निधी राखीव ठेवला जातो. या निधीतून सिग्नल बसवणे, त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे, झेब्रा क्रॉसिंग, थर्मोप्लास्टिकचे पट्टे मारणे, स्पीड ब्रेकर तयार करणे, आवश्‍यक सूचना फलक लावणे, अशी कामे या निधीतून केली जातात.

राजारामपुरीत स्पीड ब्रेकरसाठी ७० लाख?
दरवर्षी वाहतुकीसाठी पन्नास ते साठ लाखांची तरतूद केली जाते; मात्र बहुतांश वेळा अत्यावश्‍यक सेवांकडे हा निधी वळवला जातो. त्यामुळे गेली तीन वर्षे रस्त्यावर पट्टे दिसत नाहीत. गेल्या वर्षी राजारामपुरी विभागीय कार्यालयाने स्पीड ब्रेकरसाठी ७० लाखांचा निधी खर्च केल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.  

रोज ५० हजार दंड वसूल - अनिल गुजर        
महानगरपालिकेने केलेल्या उपाय योजना राबवण्याची जबाबदारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेची आहे. सिग्नलवर वाहतूक पोलिस नेमणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, अस्ताव्यस्त पार्किंग रोखणे. शहर वाहतूक शाखा दररोज जवळपास पन्नास हजारांचा दंड वसूल करते. ही रक्कम सरकारकडे जमा केली जाते असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

वसुली ट्रॅफिकची, मर्जी महापालिकेची
शहर वाहतूक नियंत्रण शाखेसाठी २१५ मनुष्यबळ निर्धारित आहे; मात्र सध्या या विभागाकडे ११५  कर्मचारी आहेत. यांतील सुट्या, रजा, कार्यालयीन काम वगळता ५० ते ६० कर्मचारीच वाहतूक नियंत्रणासाठी प्रत्यक्षात उपयोगी येतात. दररोज पन्नास हजारांचा महसूल देऊनही शहर वाहतूक शाखेला महानगरपालिकेच्या मर्जीनुसारच काम करावे लागते.     

वस्तुस्थिती...
महापालिका व शहर वाहतूक शाखेबरोबरच वाहनधारकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. सिग्नल संपण्याआधी वाहन पुढे घेणे, झेब्रा क्रॉसिंगवर 
वाहन उभे करणे, दुभाजकाच्या पुढे जाणे, वाहतूक कोंडी दरम्यान पुढे जाण्याचा आततायीपणा करणे, यामुळे वाहतूक कोंडीत अजूनच भर पडत आहे.

चला, वाहतूक कोंडी कमी करू...
वाहतूक कोंडी होते; पण ती सोडवायची कशी? तुम्हाला काय वाटते, हे कळवा. योग्य सूचनांना ठळक प्रसिद्धी देऊ. वाहतूक कोंडीची कारणे, फोटोही प्रसिद्ध करू. चला! ‘सकाळ’च्या माध्यमातून वाहतूक कोंडीवर चर्चा करू, सारे मिळून हा प्रश्‍न सोडवू...तुमची माहिती शेअर करा, 
या व्हॉटस्‌ॲप क्रमांकावर  -९१४६१९०१९१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com