एसटीतील बदल्या व सेवा स्थगितीची चौकशी होणार; परिवहन मंत्र्यांनी दिले आदेश

घनशाम नवाथे 
Monday, 28 December 2020

कोरोनाच्या संकटात राज्यात केवळ सांगली, सातारा व कोल्हापूर विभागात एसटी कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्तच्या नावाखाली बदल्या करून सेवा स्थगिती दिल्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सांगली : कोरोनाच्या संकटात राज्यात केवळ सांगली, सातारा व कोल्हापूर विभागात एसटी कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्तच्या नावाखाली बदल्या करून सेवा स्थगिती दिल्याचा प्रकार एसटी कामगार सेनेने परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर श्री. परब यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

एसटी कामगार सेनेने नुकतेच परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. तेव्हा सांगली, सातारा व कोल्हापूर विभागात अतिरिक्तच्या नावाखाली अन्यायकारक बदल्या आणि सेवा स्थगिती दिलेल्या लिपिक व टंकलेखकांची देखील कामगार सेनेने चर्चा घडवून आणली. तीन जिल्हे वगळता राज्यात कोठेही असा प्रकार घडला नाही.

कोरोना संकटाने राज्यभर थैमान घातले असताना एसटीच्या तीन विभागात मात्र कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यामुळे त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे. तसेच अन्यायकारक बदल्यांचे प्रकरणही घडले असल्याचे परिवहन मंत्री श्री. परब यांना निदर्शनास आणून दिले. तेव्हा मंत्री श्री. परब यांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल असे आश्‍वासन दिले. 

दरम्यान कामगार सेनेने मंत्री परब यांच्याशी झालेल्या चर्चेत स्वेच्छा निवृत्ती वेतन योजनेत 90 ऐवजी 180 दिवसाचा लाभ द्यावा. एकरकमी रक्कम द्यावी. निवृत्ती स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पाल्यांना महामंडळामध्ये नियुक्ती द्यावी अशी मागणी करण्यात आली. तेव्हा श्री. परब यांनी प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

यावेळी इतर मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्याबाबत श्री. परब यांनी सकारात्मकता दर्शवली. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एक हजार कोटींचे पॅकेज दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पाठपुरावा केल्याबद्दल श्री. परब यांचे आभार मानण्यात आले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers and suspension of services in ST will be investigated; Order issued by the Minister of Transport