ट्रान्स्फॉर्मर बिघडला; पिके करपणार

ट्रान्स्फॉर्मर बिघडला; पिके करपणार

तळंदगे येथील केंद्रात बिघाड - आठ दिवस तात्पुरत्या भारनियमनाचे जिल्ह्यावर संकट 
कोल्हापूर - महापारेषण कंपनीच्या तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ४०० केव्ही उपकेंद्रातील ५०० एमव्हीए क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्याने जिल्ह्याला आपत्कालीन भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे. 

येत्या दोन दिवसांत ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त झाला नाही, तर जिल्हाभरात किमान आठ दिवस तात्पुरत्या स्वरूपात भारनियमन करावे लागणार आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख कृषी पंपांना बसण्याची शक्‍यता आहे. ऐन उन्हाळ्यात वाढीव भारनियमन सुरू झाल्यास पिके करपण्याची भीती व्यक्त होत आहे.

महावितरणचे तळंदगे येथील ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून कोल्हापूर जिल्ह्याला वीजपुरवठा होतो. जिल्ह्याची सरासरी ११०० मेगावॉट इतकी विजेची मागणी आहे. या मागणीनुसार तळंदगे केंद्रात ५०० एमव्ही क्षमतेचा एक व ३१५ एमव्हीए क्षमतेचे दोन असे एकूण ११३० एमव्हीए क्षमतेचे तीन ट्रान्स्फॉर्मर आहेत. यापैकी अतिउच्चदाबाच्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाला आहे. जिल्ह्यातील ११०० मेगावॉट विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी नादुरुस्त झालेले ५०० एमव्हीए ट्रान्स्फॉर्मर तातडीने बदलण्यात यावेत, अशी विनंती महावितरणने महापारेषणकडे केली आहे. याला किमान आठ दिवस लागणार असल्याची माहिती महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. पाटील यांनी दिली. 

उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. महावितरणकडेही सध्या मुबलक प्रमाणात वीज आहे. मात्र महापारेषणचे अतिउच्चदाबाचे ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याने वीजपुरवठा करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यातून जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारनियमन चक्राकार पद्धतीने करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कमीत कमी वेळेचे भारनियमन होईल, असे नियोजन महावितरणकडून करण्यात येत आहे. त्यासाठी ग्राहकांनी विजेचा वापर काटकसरीने करावा. अनावश्‍यक वीज वापर टाळावा, असेही आवाहन मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी केले आहे.

शेतीला पहिला दणका
उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास घरगुती वीज ग्राहकांचा संताप होऊ शकतो. त्यामुळे घरगुती वीजपुरवठा सुरू ठेवण्याची तयारी महावितरण करत आहे. उर्वरित पर्याय म्हणून कृषी पंपाच्या विजेचे भारनियमन करण्यात येईल. त्यातूनही गरज भासल्यास व्यावसायिक किंवा औद्योगिक पुरवठा कमी करण्यात येणार आहे. वाढत्या उन्हामुळे शेतीला पाण्याची गरज वाढली आहे. भारनियमन वाढल्यास शेतीला फटका बसणार आहे.

दोन ट्रान्स्फॉर्मरवर लोड   
कऱ्हाड येथील मुख्य ट्रान्स्फॉर्मरमधून तळंदगे येथील एकूण तीन ट्रान्स्फॉर्मरमध्ये वीज येते. या तीनपैकी एक ट्रान्स्फॉर्मर तोही ५०० एमव्हीए क्षमतेचा आहे. तोच बिघडल्याने उर्वरित दोन्ही ट्रान्स्फॉर्मरवर लोड येऊ शकतो. यामुळे या ट्रान्स्फॉर्मरमध्येही बिघाड होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

ट्रान्स्फॉर्मरमधील बिघाड तातडीने दुरुस्त व्हावा, यासाठी महापारेषण कंपनीचे अभियंते, कर्मचारी तसेच ट्रान्स्फॉर्मरच्या कंपनीचे अभियंतेही कार्यरत आहेत. प्रसंगी अहोरात्र काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त झाला तर उद्या संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल, परंतु ट्रान्स्फॉर्मरच बदलला तर मात्र आठ दिवस भारनियमन करावे लागेल.
- ए. सी. धमाले, अभियंता (महापारेषण)

वीज वापराची क्षमता अशी 

कृषी पंप १ लाख ३२ हजार ८५२

घरगुती जोडण्या ७ लाख ८९ हजार ६०८

व्‍यावसायिक जोडण्या ७२ हजार ४१

औद्योगिक जोडण्या १९ हजार ५७४

दररोज विजेची मागणी ११०० मेगावॉट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com