आरग परिसरातील ट्रान्सफॉर्मर, पेट्या झाडे-वेलींच्या विळख्यात 

निरंजन सुतार
Friday, 25 December 2020

मिरज पूर्व भागातील आरग, बेडग परिसरात महावितरण कंपनीचा अंदाधुंद कारभार चालला आहे. सध्या अनेक ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर व पेट्यांना सभोवती वेली, झाडेझुडपे उगवली आहेत.

आरग : मिरज पूर्व भागातील आरग, बेडग परिसरात महावितरण कंपनीचा अंदाधुंद कारभार चालला आहे. सध्या अनेक ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर व पेट्यांना सभोवती वेली, झाडेझुडपे उगवली आहेत. अनेक वर्षांपासून डीपी व पेट्यांना कुलूप नसल्याने पेट्या उघड्या स्थितीत आहेत; तर काही पेट्या कमी उंचीवर बसवल्या आहेत. त्यामुळे महावितरण कंपनी जीवनाशी खेळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. 

येथे इलेक्‍ट्रिकल साहित्य असणाऱ्या उघड्या पेट्यांमुळे दुर्घटना होण्याची शक्‍यता आहे. मुले खेळताना व जनावरे चालतानाही सहज स्पर्श होऊ शकतो. शालेय परिसर बाजारपेठ रहदारीच्या ठिकाणी असलेल्या पेट्या यामुळेच अपघाताला निमंत्रण देणाऱ्या आहेत. नागरिकांनी अनेकवेळा आवाज उठवला आहे, मात्र त्याची दखल घेतलेली नाही. 

पावसाळ्यापूर्वी ट्रान्सफॉर्मरच्या परिसरातील स्वच्छता व पेट्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे; पण बहुतेक ठिकाणी तसे दिसत नाही. बिघाड झाल्यास प्रथम ट्रान्सफॉर्मर व पेट्या शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना ट्रान्सफॉर्मरचे काम सहज करता यावे, यासाठी पेट्या कमी उंचीवर बसवण्यात आल्या असल्या तरी त्या कायमस्वरूपी बंदिस्त असणे गरजेचे आहे. शेतात व रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरभोवती वेली, झाडेझुडपे वाढली आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ती काढावीत, तसेच उघड्या पेट्या बंदिस्त कराव्यात तशी मागणी होत आहे. 

ग्रामपंचायतीचा ही पाठपुरावा 
आरग येथील ग्रामपंचायतीने धोकादायक ट्रान्सफॉर्मर व उघड्या पेट्यांना कुलूप लावण्यात यावेत यासाठी महावितरणकडे दोन वर्षांपूर्वी पाठपुरावाही केला होता. मात्र त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. 

विद्युत पेट्याना कुलपे लावण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला अहवाल दिला होता. मात्र, तीस उघड्या पेट्यांनाच कुलूपे लावण्यात आली. आता पुन्हा वरिष्ठ कार्यालयाला अहवाल देऊन उघड्या विद्युत पेट्या बंद केल्या जातील. 
- सुशांत पाटील, महावितरण कनिष्ठ अभियंता, आरग 

अनेक ठिकाणी विद्युत पेट्या उघड्या आहेत. वेली, झाडाझुडपांचा विळखा वाढला आहे. मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी. 
- अमोल अ. पाटील, बेडग

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transformers in the Arag area, boxes of trees and vines