वाहतूकदारांचे 8 एप्रिलपासून "चक्का जाम' 

वाहतूकदारांचे 8 एप्रिलपासून "चक्का जाम' 

सांगली - येत्या 8 एप्रिलला मध्यरात्रीपासून वाहतूकदारांचे चक्का जाम आंदोलन सुरू होत आहे. थर्ड पार्टी विमा रकमेत चाळीस टक्‍क्‍यांची झालेली वाढ प्रथमदर्शनी कारण असले तरी वाहतूकदारांच्या अनेक प्रलंबित प्रश्‍नांबाबत शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन असेल, असे सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोशिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी, ज्येष्ठ नेते स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील यांनी सांगितले. या आंदोलनाला वाहतुकीच्या विविध संघटनांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

ते म्हणाले, ""विमा कंपन्यांच्या विविध तक्रारींबाबत आणि प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी स्थापन झालेल्या इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऍथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेशी आमचा गेल्या काही वर्षांपासूनच एकूणच विमा आकारणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. देशातील फक्त 35 टक्के वाहनधारकच विमा भरतात. जमा होणारा विमा हप्ता आणि द्यावी लागणारी नुकसानभरपाई याची माहितीच विमा कंपन्या देत नाहीत. त्यामुळे हप्ता दरवाढीचे सत्य कारणच पुढे येत नाही. केंद्रीय वाहतूक मंत्री पॉल राधाकृष्णन यांनी वाहनधारकांचे समाधान झाल्याशिवाय विमा हप्ता रकमेत वाढ करू नका, असे आदेश देऊनही दरवाढ झाली. त्यामुळे दक्षिण भारताच्या संघटनेने 30 मार्चपासून बंद आंदोलन सुरू केले आहे. 8 एप्रिलपासून देशभरातील सर्व संघटना आंदोलनात उतरणार आहेत.'' 

ते म्हणाले, ""सहा चाकी वाहनांसाठी 2011 मध्ये थर्ड पार्टी विमा रक्कम 6225 रुपये होती. ती सध्या 22 हजार 727 रुपये झाली आहे. हीच दरवाढ दहा चाकी वाहनांबाबत 10 हजार 725 रुपयांवरून 24 हजार 958 रुपये इतकी झाली आहे. याशिवाय पंधरा टक्के सेवा कर आहेच. देशात किमान 55 हून अधिक विमा कंपन्या या व्यवसायात आहेत. हे क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले केले. गेल्या काही वर्षात भरपाई जादा द्यावी लागत असल्याचे कंपन्या सांगतात, मात्र खरीखुरी माहितीच देत नाहीत. तोटाच असेल तर ते व्यवसाय कशासाठी करतात? हा व्यवसायच असेल तर लागू केलेल्या रकमेपेक्षा कमी प्रिमियमला परवानगी का नाकारली जाते? त्यामुळे थर्ड पार्टी प्रिमियमच्या माध्यमातून वाहनधारकांची लूट होत आहे. विमा रक्कम आकारणी पारदर्शक होईपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील.'' 

यावेळी राजशेखर सावळे, मोहन जोशी, प्रदीप पाटील, शंकर यादव, जयंत सावंत, भारत बोथरा, प्रितेश कोठारी, अशोक भोसले, आप्पासाहेब मोरे, टेंपोचालक संघटनेचे विजय धोकटे आदी उपस्थित होते. 

वाहतूकदारांच्या मागण्या 
थर्ड पार्टी विमा हप्ता आकारणी पारदर्शकता आणा. 
विमा कंपन्यांनी जमा आणि दिलेल्या भरपाईची माहिती द्यावी 
भाडे सल्लागार समितीची स्थापन करून त्यावर वाहतूकदारांना प्रतिनिधित्व द्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com