सलाम महाराष्ट्र !

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

उत्तर प्रदेशातील जितेंद्र दुबे, अमृतसरचे समशेर सिंग यासारख्या असंख्य ट्रक चालकांचे डाेळे पाणावले. 

सातारा ः मुसळधार पाऊस, झोंबरे वारे, चावणारे डास... पोराबाळांपासून हजारो मैल दूर गेले सात दिवस राष्ट्रीय महामार्गावर तसे आडबाजूला अडकून पडलोय. पण येथील पोलिसांसह नागरिकांनी आम्हांला काहीही कमी पडू दिले नाही. नाष्ट्यापासून जेवणापर्यंत अगदी काहीच कमी पडू दिले नाही. अशा अफलातून माणुसकीचे दर्शन घडविण्याऱ्या या महाराष्ट्राला आमचा सलाम.....! ओलावलेल्या डोळ्याच्या कडा टिपत उत्तर प्रदेशातील ट्रक चालक जितेंद्र दुबे, अमृतसरचे समशेर सिंग यासारख्या असंख्य ट्रक चालकांनी भावना व्यक्त केल्या. 
अतिवृष्टीने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचा पुर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आल्याने हजारो वाहने अडकून पडली आहेत. गेले सात दिवस ते एकाच जागेवर उभे आहेत. या सात दिवसांत मुसळधार पाऊस कोसळत होता. वेगाने वारे वहात होते. कोणीही कोणाला विचारण्याच्या मनस्थितीत नव्हते. परंतु थेट पुरग्रस्तांप्रमाणेच पुरामुळे महामार्गावर अडकलेल्या हजारो ट्रक आणि त्यांचे चालक, क्‍लिनर यांना अन्न सोडाच चहा पाणीही मिळू शकले नसते. प्रतिकुल परिस्थितीमुळे कोणती मदत येण्याची शक्‍यता फारशी नव्हती. मात्र अडकून पडलेल्या या ट्रक चालकांसाठीही सारा महाराष्ट्र धावून आला. मदतीचे हजारो हात पुढे आले. पाण्यातून वाट काढत मदत करण्यासाठी माणसं त्यांच्या पर्यंत पोचली. काही ठिकाणी गुडघाभर पाण्यातून वाट काढत जाऊन कार्यकर्त्यांनी त्यांना जेवण दिले. सातारा जिल्ह्यात आनेवाडी टोलनाक्‍यानजीक महामार्गावर अवजड ट्रकासह शेकडो ट्रकचालक अडकून पडले होते. सातारा पोलिसांसह नागरिकांनी त्यांना जेवणासह चहा, नाष्टा पाणी सारे काही दररोज व्यवस्थित पुरविले. आज (सोमवार) महामार्गावर कोल्हापूर नजीक पाणी काही ओसरू लागल्यावर या वाहनचालकांना आनेवाडी टोलनाक्‍यावरून टप्प्या टप्प्याने सोडण्यास पोलिसांनी प्रारंभ केला. त्यावेळी अडकून पडलेले ट्रकचे चालक मार्गस्थ होताना भावूक झाले होते. उत्तरप्रदेशातील ट्रक चालक जितेंद्र दुबे तसेच अमृतसरचे समशेर सिंग यांनी अवघ्या महाराष्ट्राला सलाम केला. ते म्हणाले, "" पोराबाळांपासून हजारो मैल दूर गेले सात दिवस येथे महामार्गावर तसे आडबाजूला अडकून पडलोय. पण येथील पोलिसांसह नागरिकांनी आम्हाला काहीही कमी पडू दिले नाही. कुटुंबाची आठवण येत होती. कधी मोबाईलवरून संपर्क साधत होतो. त्यांच्याशी बातचीत करीत होतो. मुलं लवकर या म्हणतात. आता पुढच्या महिन्यातच घरी जायचे. येथील लोकांनी अतिशय प्रेमाने व मायेने आम्हांला सात दिवस कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे सांभाळले आहे. आमची संपुर्ण काळजी घेणाऱ्या महाराष्ट्राला आमचा सलाम. सलाम महाराष्ट्रा.... सलाम इंडिया....!'' असे म्हणून ट्रकचालकांनी आकाशाकडे पाहात हात जोडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transporters says Salaam Maharashtra while departing from Satara