चार महिन्यांत वृक्षगणना पूर्ण करणार - शंकर गोरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

सातारा - वृक्षगणनेबाबत पालिका प्रशासन पूर्ण गांभीर्याने काम करत आहे. याबाबतची कार्यवाही सुरू आहे. येत्या चार महिन्यांत साताऱ्याची वृक्षगणना पूर्ण करून घेण्यात येईल. त्यानंतर शहराची पर्यावरणीय स्थिती तपासून प्रमुख चौकांमध्ये हवा प्रदूषणाची सद्यःस्थिती दर्शविणारे फलक लावण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सातारा - वृक्षगणनेबाबत पालिका प्रशासन पूर्ण गांभीर्याने काम करत आहे. याबाबतची कार्यवाही सुरू आहे. येत्या चार महिन्यांत साताऱ्याची वृक्षगणना पूर्ण करून घेण्यात येईल. त्यानंतर शहराची पर्यावरणीय स्थिती तपासून प्रमुख चौकांमध्ये हवा प्रदूषणाची सद्यःस्थिती दर्शविणारे फलक लावण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

पालिका क्षेत्रातील सर्व जमिनीवरील वृक्षगणना करणे पालिकांसाठी बंधनकारक आहे. मात्र, सातारा पालिका क्षेत्रात एकदाही अशी गणना झालेली नाही. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी याकामी लक्ष घातले होते. काही पर्यावरणप्रेमी कार्यकर्तेही सहकार्यासाठी पुढे आले. त्याचा अखेरपर्यंत पाठपुरावा न झाल्याने ही गणना मध्येच बारगळली. यासंदर्भात ‘सकाळ’ने आजच्या (शनिवार) अंकात या विषयावर प्रकाशझोत टाकला. 

पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोर यांच्याशी या वृत्ताच्या अनुषंगाने संपर्क साधला असता त्यांनी साताऱ्याची वृक्षगणना करण्याबाबत प्रशासन गंभीर्याने पावले टाकत आहे. याबाबतच्या प्राथमिकता पूर्ण करण्यात येत आहे. लवकरच कामाची रूपरेषा ठरवून गणना पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘‘वृक्षगणना झाल्यानंतर शहराची पर्यावरणीय सद्यःस्थिती तपासण्यात येईल. अहवालानुसार शहराचे पर्यावरण संतुलन टिकविण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्यात येईल,’’ असेही श्री. गोरे यांनी  स्पष्ट केले.  

पाच वर्षांतून एकदा ही गणना करावी लागते. सातारा हे निसर्गसंपन्न शहर असल्याची बिरुदावली आपण अभिमानाने मिरवतो. मात्र, खरंच आपण ही निसर्गसंपन्नता टिकवली आहे किंवा कसे याबाबत कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. याकरिता ही वृक्षगणना आवश्‍यक बाब समजली जाते. साताऱ्यात किती व कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत, वनाच्छादनाखालील क्षेत्र किती आहे, याची माहिती गणनेनंतर होणार आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या आणि वृक्षांची संख्या यांचे गुणोत्तर लक्षात घेऊन भविष्यकालीन उपाययोजना करणे प्रशासनाला शक्‍य होणार आहे.

शहरातील प्रमुख चौकांमध्ये तेथील हवा प्रदूषणाबाबतची सद्यःस्थिती दर्शविणारा इलेक्‍ट्रॉनिक्‍स फलक लावण्याचा येईल. याकरिता प्रायोजकांची मदत घेण्याचा आमचा प्रयत्न 
आहे.
- शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा पालिका 

Web Title: tree counting