निसर्ग संपदेची लचकेतोड

निसर्ग संपदेची लचकेतोड

भिलार - निसर्ग संपदेच्या जतनासाठी केंद्रीय मंत्रालयाने २००१ मध्ये महाबळेश्वर- पाचगणीत ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ जाहीर केला. परंतु, या झोनमधील सगळे नियम धाब्यावर बसवून सध्या नैसर्गिक संपदेचा ऱ्हास सुरू आहे. धनदांडग्यांकडून नैसर्गिक संपदेचे लचके तोडले जात आहेत. शासन यंत्रणेची त्याकडील होणारी डोळेझाक दोन्ही शहरे बकाल करणारी ठरणार आहे. 

महाबळेश्वर-पाचगणी या दोन्ही शहरे आणि परिसरात वृक्षतोड, उत्खनन, डोंगर पोखरणे, विनापरवाना टोलेजंग इमारती बांधणे असे सर्रास प्रकार धनदांडग्यांकडून खुलेआम सुरू आहेत. दोन्ही शहरांमधील बाजारपेठेतही सध्या ठिकठिकाणी बिनधास्तपणे उत्खनन व बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. अधिकारी व महसूल विभागाला हाताशी धरून हे सारे प्रकार सुरू आहेत. अगदी पाचगणी, महाबळेश्वरबरोबरच शेजारील मेटतळे, मेटगुताड, भोसे, भिलार, कासवंड, गणेशपेठ, पांगारी, तायघाट, खिंगर, दांडेघर या परिसरात अक्षरशः अनधिकृत बांधकामांनी उच्छाद मांडलेला आहे. उत्खनने, बांधकामांना ऊत आला असताना महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प का आहे? याचे कोडे सर्वसामान्यांना पडलेले आहे. एखाद्या सर्वसामान्याने शेतीसाठी उकराउकरी केली की लगेच ‘महसूल’चे अधिकारी आपल्या कारवाईचा बडगा गोरगरिबांना दाखवतात. परंतु, या धनदांडग्यांना मात्र तडजोडीने पाठीशी घातले जाते. एखादी तक्रार वाढल्यास त्याच्यावर जुजबी कारवाई केली जाते. अगोदर तडजोडीचा सोपस्कार पूर्ण झाल्यावर सुटीच्या दिवशी कामकाजाचा प्रारंभ होतो आणि तक्रार आल्यावर लगेच उत्खननाचा ब्रासवर किरकोळ दंड भरून घेतला जातो. या साऱ्या प्रकारामुळे हे धनदांडगे सरावले असून, त्यामुळेच पाचगणी- महाबळेश्वर आणि परिसरात बांधकामे, उत्खनने आणि वृक्षतोड उदंड जाहली आहेत. महसूल यंत्रणा व हे बांधकाम मालक यांचा हा पाठशिवणीचा खेळ जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत हे असेच चालणार आहे.

जागा खरेदीपासून ‘कमिशन’चा धंदा या दोन्ही पर्यटनस्थळांवर फोफावलेला आहे. तलाठी, मंडल कार्यालयाच्याभोवती एजंट लोकांचा अक्षरशः गराडा पडलेला दिसतो. जागा खरेदी करून द्यायची, कागदपत्रे, बांधकाम परवाने आणि नंतर ठेकेदारीची जबाबदारीही एकच व्यक्ती घेत असल्यामुळे जादा कमिशन आणि सोयीस्कर कामामुळे या धनदांडग्यांचे प्रस्थ सद्या परिसरात फोफावले आहे. 

पत्रा, नेटच्या आडोशात सर्रास बांधकामे सुरू
सध्या या दोन्ही शहरांसह परिसरातील ग्रामीण भागात सध्या जागेभोवती पत्रा अथवा नेटच्या साह्याने आडोसा उभारून अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना आवर घालण्याची मुख्य जबाबदारी असणारी यंत्रणाच पोखरली गेली असल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र पर्यावरण वाचवण्याची कुचकामी आर्त हाक देत आहेत.

अनधिकृत बांधकामे आणि विनापरवाना उत्खनन करणाऱ्या लोकांना आम्ही रितसर नोटिसा देऊन त्यांचे पंचनामे करून ते कारवाईसाठी पाठवत असतो. बऱ्याच लोकांना यामधून दंड झालेला आहे. बऱ्याच बांधकामांवर आम्ही कारवाई केली आहे. परंतु, उरलेल्या बांधकामांचे पंचनामे करण्याचे आमचे काम सुरू आहे. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यातून कुणीही सुटणार नाही.
- श्री. ढगे, मंडलाधिकारी, पाचगणी सजा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com