सातारा शहर बहरणार वृक्षराजींनी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

अमृत योजनेतून पावसाळ्यात दहा हजार झाडांची लागवड; निविदा प्रक्रिया सुरू

सातारा - रस्ता दुभाजकामध्ये पान-फुलांनी सजलेली झाडे, विविध रस्त्यांच्या दुतर्फा डेरेदार- सावली देणारे वृक्ष हे स्वप्नवत वाटणारे चित्र सातारकरांसाठी आता लांब राहिलेले नाही. अमृत योजनेतून याकरिता एक कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्याची निविदा निघाली असून, येत्या पावसाळ्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. 

अमृत योजनेतून पावसाळ्यात दहा हजार झाडांची लागवड; निविदा प्रक्रिया सुरू

सातारा - रस्ता दुभाजकामध्ये पान-फुलांनी सजलेली झाडे, विविध रस्त्यांच्या दुतर्फा डेरेदार- सावली देणारे वृक्ष हे स्वप्नवत वाटणारे चित्र सातारकरांसाठी आता लांब राहिलेले नाही. अमृत योजनेतून याकरिता एक कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्याची निविदा निघाली असून, येत्या पावसाळ्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. 

काय आहे योजना
‘स्मार्ट साताऱ्यासाठी’ पालिकेने केंद्र शासनास सादर केलेल्या वृक्षारोपणाच्या प्रस्तावास अमृत योजनेतून एक कोटी रुपयांचा निधी गेल्या वर्षी मंजूर झाला आहे. या योजनेतून सातारा शहर व परिसरात दहा हजार झाडांची लागवड व संगोपन होणार आहे. लावण्यात येणारी रोपे ही पुरेशा उंचीची असतील. साधारण तीन वर्षे वयाची, दहा ते १२ फूट उंचीची ही रोपे असतील. त्यामुळे त्यांचे लवकर मूळ धरून जगण्याचे प्रमाण ९० टक्के इतक अधिक असेल. 

दुतर्फा मिळेल सावली
रस्त्याचा दुतर्फा वृक्षारोपणासाठी शहरातील १९ रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. या रस्त्यांची एकूण लांबी २३ किलोमीटर असेल. याठिकाणी पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. या रस्त्यांवर कडुनिंब, कांचन, बरचेरी, बकूळ, सोनचाफा, बहावा, अर्जुन, सीताअशोक, चिंच, मिनीबदाम आदी प्रकारचे वृक्ष लावण्यात येतील. काही ठिकाणी दुभाजकांमध्ये ८२७ झाडे लावण्याचे नियोजन आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात गेंडामाळ नाका, सोनगाव कचरा डेपो, सांबरवाडी शुद्धीकरण प्रकल्प, महादरे तलाव परिसर आदी शहरातील १५ ठिकाणी सुमारे १९ हेक्‍टर क्षेत्रात दोन हजार २७८ सावली देणारी झाडे लावण्यात येतील. 

जबाबदारी मक्‍तेदाराची 
अमृत योजनेंतर्गत वृक्षारोपणाचा पहिला टप्पा म्हणून २० लाख रुपयांचा निधी सातारा पालिकेच्या तिजोरीत जमा झाला. या कामाची निविदा प्रक्रिया नुकतीच सुरू झाली. महिना-दीड महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरवात होईल, असा विश्‍वास पालिका सूत्रांनी व्यक्त केला. पालिका दर वर्षी वृक्षारोपण करते. रोपे वेगवेगळी असतात, खड्डा मात्र तोच असतो, असा आजपर्यंतचा वृक्षारोपणाच्या बाबतीतील अनुभव आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून लावलेल्या रोपांची एक वर्ष निगा राखण्याची जबाबदारी संबंधित मक्‍तेदाराची असेल, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. 

‘निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, पावसाळ्यात कामास प्रत्यक्ष सुरवात होईल. या योजनेशिवाय शासनाच्या वृक्षलागवड योजनेंतर्गत स्वतंत्रपणे शहरात वृक्षलागवड करण्यात येईल.’’
- शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा पालिका

Web Title: tree plantation in satara city