चला, ऑक्‍सिजन, सावली देणाऱ्या झाडांना वाचवूया! 

परशुराम कोकणे 
बुधवार, 4 एप्रिल 2018

माझ्या दुकानासमोरील झाडांचे आम्ही संवर्धन केले आहे. तसेच बागेतील झाडांचे संवर्धन व्हावे यासाठी मी प्रयत्न करीत आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत प्रत्येकाने आपल्या घराजवळील, दुकानासमोरील, कार्यालयाच्या परिसरातील झाडांना पाणी देऊन संवर्धन करण्यासाठी पुढे आले पाहिजे. 
- पुरुषोत्तम वगा, व्यावसायिक 

सोलापूर : तापमान 40 अंशांवर गेले असून उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. पशू-पक्ष्यांसह माणसंही हैराण झाली आहेत. उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी झाडं लावली पाहिजेत, हे साऱ्यांनाच कळतंय पण वळताना दिसत नाही. वृक्षारोपण आणि संवर्धनाचा नुसताच दिखावा थांबवून आपल्या साऱ्यांना आता उन्हाळ्याच्या दोन-चार महिन्यांत घराजवळ, कार्यालयाजवळ, आपण रोज ज्या रस्त्यावरून जातोय, त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना रोज थोडंसं पाणी देऊन देखभालीसाठी पुढे येण्याची गरज आहे. 

उन्हाचा त्रास टाळण्यासाठी झाडं लावा आणि त्यांचे संवर्धन करा, यासारखे मेसेजही सोशल मीडियावर फिरत आहेत. बाजारात गेल्यावर गाडी पार्किंग करण्यासाठी झाडांची सावली असलेली जागा कोठेच दिसत नाही. याबाबत चिंता व्यक्त करणारे शेकडो मेसेज फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर पोस्ट केले जात आहेत. पण प्रत्यक्षात कृती करताना कोणीच दिसत नाही. पाण्याअभावी अनेक ठिकाणी झाडांनी माना टाकायला सुरवात केली आहे. सोलापुरात जवळपास सर्वच रस्त्यांवर महापालिकेसह विविध संस्था, संघटना, खासगी कंपन्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे, पण पाण्याअभावी अनेक झाडं जळत आहेत. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात प्रत्येकाने आपल्या घरासमोरील, दुकान आणि कार्यालयासमोरील झाड दत्तक घेऊन त्यांना पाणी देण्याबरोबरच संवर्धनासाठी पुढे येण्याची गरज आहे. 

माझ्या दुकानासमोरील झाडांचे आम्ही संवर्धन केले आहे. तसेच बागेतील झाडांचे संवर्धन व्हावे यासाठी मी प्रयत्न करीत आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत प्रत्येकाने आपल्या घराजवळील, दुकानासमोरील, कार्यालयाच्या परिसरातील झाडांना पाणी देऊन संवर्धन करण्यासाठी पुढे आले पाहिजे. 
- पुरुषोत्तम वगा, व्यावसायिक 

उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक झाडे जळून जातात. मी घरातून बाहेर पडताना सोबत एक पाण्याची बाटली घेऊन जातो. रस्त्यावरील एखाद्या झाडाला पाणी देऊन पुढे जातो. वृक्षारोपणासोबच वृक्षांच्या संवर्धनासाठी साऱ्यांनी पुढे यायला हवे. 
- अभिजित भडंगे, वृक्षप्रेमी

Web Title: tree save campaign in Solapur