Trekking craze is growing in Belgaum
Trekking craze is growing in Belgaum

बेळगावकरांत वाढतेय ट्रेकिंगची क्रेझ ; लॉकडाउननंतर पुन्हा बेत

बेळगाव - कोरोना कालावधीत स्वतःला बंदिस्त करुन घेतलेले ट्रेकर्स आता पुन्हा सक्रिय होऊ लागले आहेत. गतवर्षी उन्हाळा आणि पावसाळा असे दोन्ही ऋतू लॉकडाउनमध्ये गेले. हिवाळ्यात लॉकडाउन शिथिल होताच पर्यटनस्थळांसह जंगल सफारी, समुद्र किनाऱ्यांना भेटी देण्यासह डोंगर चढण्याची क्रेझ पुन्हा वाढल्याचे चित्र शहर, परिसरात दिसून येत आहे. 

कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी गत मार्च अखेरपासून लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे लोक पाच ते सहा महिने घरीच बंदिस्त होते. परिणामी पर्यटनस्थळांना भेट देणे, साहसी खेळ किंवा त्याचा सराव करणे शक्‍य झाले नाही. आता स्थितीत सुधारणा झाल्यामुळे पर्यावरणाची आवड व ट्रेकिंगचे वेड असणाऱ्या युवकांना पर्यटनस्थळे खुणावू लागली आहेत. गत काही वर्षात बेळगावात ट्रेकिंगची क्रेझ वाढली आहे. विविध कंपनी आणि ट्रेकिंग संस्था ट्रेकिंगचे आयोजित करत आहेत. जिल्ह्यात खानापूर जंगल प्रदेश, कारवार, जांबोटी, कणबर्गी, नेरसा, गोल्याळी वनप्रदेश, कळसा-भांडुरा, सुर्ल आदी ठिकाणी भेटी देण्याचे प्रमाण तरुणांत वाढले आहे. गोकाक आणि गोकाकपासून केवळ दहा किलोमीटरवर असलेल्या गोडचिनमलकी धबधब्यालाही भेटी दिल्या जात आहेत. परंतु, तेथे सध्या कमी पाणी असल्यामुळे गर्दी घटली आहे. 

सहलीचे औचित्य साधून बेळगावातील विविध ग्रुप सुट्टीदिवशी तसेच रविवारी बाहेरगावी जातात. त्यांच्याकडून गडकिल्ले किंवा ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या जातात. ऍड. एन. आर. लातूर यांनी अलीकडेच या स्वरुपाचा एक ग्रुप तयार करुन दर रविवारी नवीन ठिकाणाला भेट देण्याचा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या ग्रुपमध्ये 50 हून अधिक पुरुष आणि महिलांचा समावेश असून ते सर्वजण सुट्टीदिवशी एकत्र येऊन भटकंतीची हौस पूर्ण करतात. बेळगावातील फक्त महिलांचाही ग्रुप असून त्याही प्रत्येक रविवारी जंगल किंवा प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. तर युवकांच्या ग्रुपकडून दर शनिवारी व रविवारी असे दोन दिवस खानापूर किंवा कारवारमधील जंगल, प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन ट्रेकिंगचा आनंद लुटतात. 

 सुरक्षेबाबत काळजी हवी 
अनेक युवक जुजबी ज्ञानाच्या जोरावर ट्रेकिंगचा बेत आखतात. ट्रेकिंग करतानाही बऱ्याचदा आवश्‍यक काळजीही घेतली जात नाही. काही वेळा संभाव्य धोक्‍याचा अंदाज न घेता धाडस दाखविले जाते. या स्वरुपाच्या घटनांत जखमी होणे किंवा काही बाबतीत जीव गमाविण्याचा धोका असतो. त्यामुळे सुरक्षेची दक्षता घेऊन ट्रेकिंगचा बेत आखणे उत्तम ठरणार आहे. 

या वस्तू हव्यातच 
-पाण्याची बाटली 
-आवश्‍यक साहित्य ठेवण्यासाठी सॅक 
-हेड टॉर्च 
-काठी 
-गॉगल 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com