गिर्यारोहणातून मिळते संकटांशी मुकाबला करण्याची ताकद! 

परशुराम कोकणे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

सोलापूर : रोजच्या धावपळीतून थोडसं स्वत:साठी वेळ काढून ट्रेकिंगला गिर्यारोहणाला जाण्याचा छंद अनेकांत दिसून येत आहे. मुंबई, पुण्यासोबत सोलापुरात गिर्यारोहकांची आवड निर्माण होत आहे. स्वयंपूर्णता, आत्मविश्‍वास, जिद्द, बंधुभाव, समजूतदारपणा, तडजोड करण्याची वृत्ती, निसर्गप्रेम, प्रसंगावधान, संकटाशी मुकाबला करण्याची ताकद आदी गिर्यारोहणातून मिळते. तसेच माणसाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा पुरेपूर कस लागतो, असे अनुभवी ट्रेकर्सचे सांगतात. 

जागतिक गिर्यारोहण दिनाच्या निमित्ताने सकाळने सोलापुरातील गिर्यारोहण प्रेमींचा आढावा घेतला. सोलापुरात एव्हरेस्टवीर डॉ. आनंद बनसोडे, निहाल बागवान, बालाजी जाधव, राजेंद्र डांगे, डॉ. सुनील खट्टे, आप्पा बिराजदार, निखिल यादव, सुनील पाटील, करण पंजाबी, अनुराधा काजळे, राजेंद्र काकडे, आर्या शेटे, राज नडगिरे, डॉ. संभाजी भोसले, अमोल मोहिते, भाऊराव भोसले, कपिल पवार, गणेश पवार, संजीवकुमार कलशेट्टी, महेंद्र राजे यांच्यासह अनेकजण गिर्यारोहणाची आवड जोपासत आहेत. 

निसर्गाने माणसाला सह्याद्री आणि हिमालय या दोन अमूल्य देणग्या दिल्या आहेत. सह्याद्री आणि हिमालयातील भटकंतीतून जे मिळतं ते शब्दात सांगता येणार नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. 
गिर्यारोहणात डोंगर भटकंती, कातळारोहण, पर्वतारोहण, हिमालयातील मोहिमा यांचा समावेश होतो. भारतात उत्तर काशीत नेहरू इस्टिट्यूट ऑफ माऊटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, पहेलगाम येथे जवाहरलाल नेहरू माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट यासह इतर संस्थांत गिर्यारोहणाचे प्रशिक्षण मिळते. 

शिक्षक असलेले गिर्यारोहक राजेंद्र डांगे म्हणतात, "गिर्यारोहण या छंदाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतीही स्पर्धा नाही. आव्हानांची कमतरता तर नाहीच नाही. वेळेचे बंधन नाही. वयाची आडकाठी नाही. सर्वार्थाने मुक्त असा हा छंद आहे. यासाठी असायला हवी फक्त मनातील ऊर्जा. गिर्यारोहणात निसर्ग एकीकडे निसर्गाचे रौद्ररूप दाखवतो तर दुसरीकडे सूर्यास्ताला रंगबिरंगी छटांचे दर्शन घडवतो. वादळाची, धुवाधार पावसाची गाठ घालून देतो तर कधी धगधगत्या उन्हाचे चटके घ्यायला लावतो. तर बर्फाच्या भिंतींवर हेलकावे घ्यायला लावतो. कातळ, दऱ्या, सुळक्‍यांमधून राकट पुरुषी सौंदर्य दाखवतो. तर कधी पाठीवर मोकळे सोडलेल्या लतावेलींमधून जंगली हिरवाईचे लावण्य दाखवतो.' 

गिर्यारोहण हा एक सर्वांगसुंदर असा छंद असून साहस हा त्याचा स्थायीभाव आहे. एकमेकांना मदत हे गिर्यारोहणाचे तत्त्व आहे. गिर्यारोहण हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतो. निसर्गातील भटकंतीमुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व बदलून जाते. 
- राजेंद्र डांगे, गिर्यारोहक

Web Title: trekking gives power to fight with problems