सांगली जिल्हा परिषदेत "बिलो टेंडर'च्या करामती;  ठेकेदारांची मनमर्जी

अजित झळके
Thursday, 17 December 2020

सांगली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदारांची मनमर्जी सुरु झाली आहे. निविदांपेक्षा 25 टक्के कमी दराने कामे पदरात पाडून घेतली जात आहेत.

सांगली : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदारांची मनमर्जी सुरु झाली आहे. एकीकडे मजूर सोसायट्यांनी पाच टक्‍क्‍यांचा खेळ मांडला आहे आणि त्यातच आता निविदांपेक्षा 25 टक्के कमी दराने कामे पदरात पाडून घेतली जात आहेत. या साऱ्याचा अर्थ बांधकाम विभागाचे अधिकारी "इस्टिमेट' करताना जादा करून ठेकेदारांना अनुकुलता दाखवत आहेत किंवा ठेकेदार 25 टक्के कमी दराने काम घेऊन ते तकलादू करत आहेत. कायद्याच्या चौकटी पलीकडे जावून या कामांचा पंचनामा करण्याची गरज आहे. या करामती महापालिकेला लाजवणाऱ्या आहेत. 

जिल्हा परिषदेत बांधकाम विभागाने अक्षरशः गोंधळ घातला आहे. श्री. गुडेवार यांच्या नियंत्रणातील या विभागात बिलो टेंडरने आता एकापेक्षा एक विक्रम रचायला सुरवात केली आहे. "दर पाडा, कोण किती अधिक पाडतोय बघू', असा सारा प्रकार सुरु आहे. अगदी 25 टक्के, 30 टक्के कमी दराने कामे घेतली जात आहे.

मजूर सोसायट्यांनी एवढ्या कमी दराने काम घ्यायचे, त्यात आपला 5 टक्के वाटा ठेवायचा, कामाला पोटठेकेदार नेमायचा, त्यात कारभारी आणि अधिकारी यांची मलई द्यायची, पोटठेकेदाराने फायदा राखायचा आणि मग राहिलेल्या पैशातून काम करायचे.

अशा प्रकाराने किती पैसा प्रत्यक्ष कामावर खर्च होत असेल? त्यामुळे 10 टक्‍क्‍यांहून अधिक "बिलो' गेलेल्या ठेकेदारांच्या कामाची चौकशी करणे गरजेचे आहे. त्यांनी कोणते सिमेंट वापरले, खडी वापरली की फक्की, फरशी कोणती वापरली याचा पंचनामाच करण्याची गरज आहे. 

फोटो पुरती सळी 
अनेक छोट्या पुलांचे कॉंक्रीट करताना ठेकेदारांनी उभ्या, आडव्या सळ्या टाकल्या. फोटो काढले. त्यानंतर त्यातून उभी सळी काढून घेतली आणि कॉंक्रिट ओतले. कसा पूल टिकणार? त्याची ना कधी चौकशी झाली, नाही कामाच्या दर्जाची गांभिर्याने तपासणी झाली. 

सिमेंट नाही, फक्कीचा वापर 

जिल्हा परिषदेच्या कामांत कोणते सिमेंट वापरले जात आहे, याचे आधी ऑडिट करण्याची गरज आहे. सर्वात मोठा गफला त्यात आहे. अत्यत हलक्‍या दर्जाचे सिमेंट वापरून लोकांच्या जिवाशी खेळ मांडण्यात आला आहे. हेच सिमेंट ठेकेदार त्याच्या स्वतःच्या घराला वापरेल का ? 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tricks of "below Tender" in Sangli Zilla Parishad by contractors

Tags
टॉपिकस
Topic Tags: