महामार्ग नव्हे, मृत्यूचा सापळा!

त्रिपुटी खिंड ते खावली - महामार्गाचे काम रेंगाळल्याने धुळीतून वाहनचालकाला मार्ग काढावा लागत आहे.
त्रिपुटी खिंड ते खावली - महामार्गाचे काम रेंगाळल्याने धुळीतून वाहनचालकाला मार्ग काढावा लागत आहे.

गोडोली - मागील सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम त्रिपुटी खिंड ते खावलीदरम्यान थंडावले आहे. परिणामी या ठिकाणचा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. धूळ, चढ-उताराचा रस्ता, दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात भराव अशा विचित्र स्थितीत शेकडो चालक मेटाकुटीला येऊन रोज मृत्यूला बगल देऊन प्रवास करत आहेत. 

नव्याने मंजूर झालेल्या सातारा-पंढरपूर या महामार्गाचे काम गेल्या वर्षापासून धिम्या गतीने सुरू आहे. वाढती वाहनांची संख्या लक्षात घेऊन व लोकांच्या सोयीसाठी हा महामार्ग हाती घेण्यात आला आहे. या कामात शंभर वर्षांपूर्वीची जुनी वृक्षराई तोडून टाकण्यात आली आहे. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा भकास झाल्या आहेत. लवकरच रुंदीकरण होईल, या आशेवर प्रवासी वर्ग होता. मात्र, संबंधित ठेकेदाराने खिंडीपासून खावलीपर्यंत मूळ रस्ता उखडून जुन्या लहान पुलांचे रुंदीकरण व लांबी वाढवली आहे. दक्षिण बाजूला रस्त्याची उंची वाढवण्यासाठी मुरमाचा भराव टाकला आहे. चढ-उताराची अशीच स्थिती खावलीपर्यंत कमी-अधिक प्रमाणात आहे. या रस्त्यावर ठेकेदाराने कोणत्याच प्रकारची काळजी घेतलेली नाही. त्यामुळे प्रत्येक वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवताना दिसत आहे. वाहन पुढे गेले की, धुळीचा लोट मागे उडतो. त्यामुळे पुढून येणाऱ्या वाहनचालकाला दिवसा दिवे लावून वाहन चालवावे लागत आहे. खडबडीत रस्त्यावरून दुचाकी वाहन चालवणे म्हणजे कोणत्या क्षणी वाहन कोलमडेल, हे सांगता येत नाही. कधी तरी पाण्याचा शिडकावा टाकलेला दिसतो. लोकप्रतिनिधी याच रस्त्यावरून ये-जा करतात. सातारा व कोकणात जाण्यासाठी हा एकमेव जवळचा मार्ग आहे. शेकडो वाहनांची रोज ये-जा होताना वाहनांची झीज, लहान-मोठे अपघात, मानसिक व शारीरिक ताण वाहनचालकांना सहन करावा लागतो.

जर हे काम वेळेत करावयाचे नव्हते तर मूळ रस्ता खोदला कशासाठी? उंचच भराव टाकला कशासाठी? झाडे तोडली कशासाठी? चर खणले कशासाठी, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होऊनही त्याचा जाब कोणाला विचारायचा अशी स्थिती आहे. उर्वरित काम सुरू झाले नाही तर प्रवासी वाहतूक संघटना रास्ता रोको आंदोलन करण्याच्या विचारात आहेत. संबंधित ठेकेदाराने वेळीच दखल न घेतल्यास व अपघात झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जाईल, असा इशाराही या संघटनेने दिला आहे. पुढील काळात सर्वच उमेदवारांनी मत मागण्याअगोदर सार्वजनिक हितासाठी रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com