पुणे बंगळूर महामार्गावर आठ वाहनांना ट्रकची धडक ; हवालदार सुनील शेलार जखमी

पुरुषाेत्तम डेरे
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

सद्यस्थितीत या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्रातून देण्यात आली.

कवठे (जि. सातारा) :  पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील अतिशय धोकादायक व मृत्यूचा सापळा समजल्या जाणाऱ्या एस कॉर्नर लगत कंटेनर पलटी होवून मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करीत असतानाच पाठीमागून ब्रेक निकामी होऊन भरधाव वेगाने आलेल्या मालट्रकने महामार्गावर अपघात झालेल्या ठिकाणी थांबलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली.

यामुळे झालेल्या अपघातात दोन वाहनांमध्ये अडकून भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात आज (रविवारी) सकाळी आठच्या दरम्यान झाला. सुनील विठ्ठल शेलार असे जखमी हवालदाराचे नाव आहे.


घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील   खंबाटकी घाटामध्ये रविवारी सकाळी आठच्या सुमारास एस कॉर्नरलगत कंटेनर (एमएच ०६ एक्यू ८९२३) हा भरधाव वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गावर पलटी झाला. या अपघातामुळे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस व भुईंज पोलीस महामार्ग केंद्राचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी महार्गावर पलटी झालेला कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेत होते. पंधरा मिनिटांच्या कालावधीच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मालट्रक (केए २६ ६४४७) चे ब्रेक निकामी झाल्याने हा भीषण अपघात झाला.

यावेळी मालट्रकने महामार्गावर उभे असलेल्या सात ते आठ वाहनांना विचित्रपणे धडक दिली. यावेळी त्याठिकाणी वाहतूक सुरळीत करत असलेले भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार सुनील शेलार हे वाहनामध्ये अडकले जाऊन वाहनांची धडक बसल्याने गंभीर जखमी झाले.

खंडाळा पोलिसांनी व भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी
सुनील शेलार यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सातारा येथील रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी पुणे या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये दाखल कारण्याची प्रक्रिया सुरु होती.

सद्यस्थितीत या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्रातून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truck collides with eight vehicles on Pune Bangalore highway; Havldar Sunil Shelar injured