सोलापूर: ट्रकखाली पोलिसाला चिरडून चालकाचे पलायन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

बोरामणी नाका परिसरात ट्रक चालकाने एका रिक्षाला धडक दिली. वाहतूक पोलिसांनी ट्रक (क्र. एम.एच. 12 एचडी 7736) थांबविण्याचा प्रयत्न केला पण ट्रक तसाच पुढे निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी माहिती नियंत्रण कक्षाला कळविली. नियंत्रण कक्षाने कॉल दिल्यानंतर पोलिस कर्मचारी नागनाथ ननवरे यांनी मार्केट यार्ड चौकात कारवाईसाठी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर : वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ट्रकचालकास कारवाईसाठी थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसाला ट्रक चालकाने चिरडले. ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. नागनाथ शंकर ननवरे (वय 51) असे मृत पोलिसाचे नाव आहे. पुणे रस्त्यावर एका हॉटेलजवळ चालकाने ट्रक सोडून पळ काढला. 

बोरामणी नाका परिसरात ट्रक चालकाने एका रिक्षाला धडक दिली. वाहतूक पोलिसांनी ट्रक (क्र. एम.एच. 12 एचडी 7736) थांबविण्याचा प्रयत्न केला पण ट्रक तसाच पुढे निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी माहिती नियंत्रण कक्षाला कळविली. नियंत्रण कक्षाने कॉल दिल्यानंतर पोलिस कर्मचारी नागनाथ ननवरे यांनी मार्केट यार्ड चौकात कारवाईसाठी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. चालकाने पोलिस कर्मचारी ननवरे यांना न जुमानता ट्रक तसाच पुढे नेला. ननवरे यांनी ट्रकला पकडून अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने लाथ मारून ननवरे यांना खाली पाडले आणि अंगावरून ट्रक नेला. 

जखमी पोलिस कर्मचारी ननवरे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त वैशाली शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

Web Title: truck driver killed policeman in Solapur