वाघवाडी फाट्यावर कंटेनरला ट्रकची धडक

accident.jpg
accident.jpg

इस्लामपूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाटा (ता.वाळवा) येथे धोकादायकरित्या लावलेल्या कंटेनरला आयशर ट्रकने मागून दिलेल्या धडकेत आयशरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. शहाहुसेन शब्बीर शेख (वय 26, रा. अंकलीखुर, चिकोडी) व सोहेल दस्तगीर मुरगुडे (वय 24, रा. खानापूर बेळगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. जखमी आयशर चालक महंमदसलाउद्दीन सरदार देसाई (वय39, रा. मेहबुबनगर, चिकोडी, जि.बेळगाव) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महंमदसलाउद्दीन देसाई हे सौ. दिलशाद शब्बीर शेख (रा. चिकोडी) यांच्या मालकीच्या आयशर ट्रक नं (एम.एच.48 टी. 5642) या गाडीवरती गेले दोन वर्षापासून चालक म्हणून काम करीत आहेत. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ते मुंबई येथून माल भरुन बेळगाव येथे सोडण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत गाडीमध्ये सौ. दिलशाद शेख यांचा मुलगा शहाहुसेन शेख व त्याचा मावस भाऊ सोहेल मुरगुडे हे किन्नर बाजूस बसले होते. आज पाहटे चारच्या सुमारास गाडी वाघवाडी फाटा येथे आल्यानंतर जोराचा पाऊस चालू होता. कंटेनर चालकाने पार्किंग लाइट व रिफ्लेक्‍टर लाइट न लावता धोकादायक रित्या महामार्गावर कंटेनर लावला होता. रोडवर सुरक्षितेकरीता काहीही ठेवले नव्हते. जोराच्या पावसात देसाई यांना हा कंटेनर दिसला नाही. त्यांनी अचानक आयशरच ब्रेक मारला.

आयशर ट्रक घसरुन पुढे थांबलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून धडकला. यात आयशर गाडीचे संपूर्ण केबिन आत दबल्याने चालक देसाई हे गंभीर जखमी झाले. तर किन्नर बाजूस बसलेले शहाहुसेन शेख व सोहेल मुरगुडे यांचा जागीच मृत्यू झाला. पावसामुळे कंटेनरचा नंबर महंमदसलाउद्दीन देसाई यांना दिसला नाही. अपघात होताच कंटेनर कोल्हापूर दिशेला निघून गेला. या अपघातात आयशर केबिनचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच चालक देसाई यांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाविरुध्द इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आयशर चालक महंमदसलाउद्दीन देसाई यांनी याबाबतची फिर्याद इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com