समाजसेवेबद्दल अण्णा काय म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

""आज, उद्या काय करावं, हे ठरविण्यापेक्षा जीवनात काय करावं, हे ठरविता आलं पाहिजे. दुसऱ्यांना दिलेल्या आनंदातच आपल्याला सुख शोधता आला पाहिजे. जगात आनंद मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. मात्र, खरा आनंद बाहेर नसून, तो अंतरंगात, समाजसेवेत आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. 

राळेगणसिद्धी : ""आज, उद्या काय करावं, हे ठरविण्यापेक्षा जीवनात काय करावं, हे ठरविता आलं पाहिजे. दुसऱ्यांना दिलेल्या आनंदातच आपल्याला सुख शोधता आला पाहिजे. जगात आनंद मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. मात्र, खरा आनंद बाहेर नसून, तो अंतरंगात, समाजसेवेत आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. 

मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या 17व्या स्मृतिदिनानिमित्त राळेगणसिद्धी येथे आयोजित नेत्रतपासणी शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी हजारे बोलत होते. शिबिरात दिवसभरात एक हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी डॉ. तात्याराव लहाने यांच्या वैद्यकीय पथकाने केली. डॉ. लहाने यांच्यासह डॉ. रागिणी पारेख, आमदार नीलेश लंके, उपायुक्त डॉ. गणेश पोटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, सरपंच संगीता मापारी, उपसरपंच सुरेश दगडू पठारे, दादा पठारे, माजी सरपंच जयसिंग मापारी आदी उपस्थित होते. 

डॉ. लहाने म्हणाले, ""राळेगणसिद्धीसारख्या ग्रामीण भागात होणाऱ्या नेत्रतपासणी शिबिराला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णावर उपचार केले जातील. पुढील उपचार अथवा शस्त्रक्रिया आवश्‍यक असणाऱ्या रुग्णांवर 26 डिसेंबर रोजी नगर येथील जिल्हा रुग्णालयात केल्या जातील. त्यामुळे हे शिबिर फक्त आजच्या दिवसापुरते मर्यादित नाही. येथे नोंदणी केलेल्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि सर्व उपचार मोफत करण्यात येतील.

'' प्रास्ताविक उद्योजक सुरेश राजाराम पठारे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष पठारे यांनी केले. 

घरच्या सदस्याप्रमाणे रुग्णांची काळजी 
माजी उपसरपंच लाभेश औटी म्हणाले, ""राळेगणसिद्धी येथे झालेल्या आरोग्य शिबिरात प्रत्येक रुग्णाची डॉक्‍टरांकडून तपासणी करून घेण्यात येईल. डॉक्‍टरांनी सुचविलेले उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी गरज पडल्यास स्वखर्चाने मुंबईला घेऊन जाऊ. उपचार पूर्ण होईपर्यंत आपण रुग्णांबरोबरच थांबू. प्रत्येक रुग्णाची घरच्या सदस्याप्रमाणे काळजी घेण्यात येईल.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The true joy lies in social service: Hazare