जेसीबी अंगावर घालून तहसीलदार उमेश पाटील यांना ठार मारण्याचा प्रयत्न

सुनील गर्जे 
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

वाळूतस्करांनी नेवाशाचे तहसीदार उमेश पाटील व महसूल पथकाच्या अंगावर जेसीबी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करून वाळूवाहने पळून नेली. हा प्रकार निंभारी-पाचेगाव रस्त्यावर सोमवार (ता. 6) ला रात्री साडेदहा ते एकच्या सुमारास घडला.

नेवासे : छापा मारून जप्त केलेल्या वाळूसाठ्यातुन रात्रीच्यावेळी ढंपर व जेसीबीच्या सहाय्याने वाळूचोरी करत असताना रंगेहात पकडल्यावर वाळूतस्करांनी नेवाशाचे तहसीदार उमेश पाटील व महसूल पथकाच्या अंगावर जेसीबी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करून वाळूवाहने पळून नेली. हा प्रकार निंभारी-पाचेगाव रस्त्यावर सोमवार (ता. 6) ला रात्री साडेदहा ते एकच्या सुमारास घडला. याप्रकरणी नेवासे पोलिसांत आठजणांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान प्रवरातीरी महसूल व पोलिस आणि वाळूतस्कर यांचा तब्बल तीनतास चाललेल्या पाठशिवणीचा हा खेळ वाळूतस्कर वाहनांसह तालुका महसूल हद्दी बाहेर पळून गेल्यावर रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान संपला.

नेवाशाचे तहसिलदार उमेश पाटील यांनी गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी तालुक्यातील निंभारी परिसरातील शंभर व चोवीस ब्रास आशा दोन ठिकाणी बेकायदा वाळू साठ्यावर छापा मारून ते ताब्यात घेवून संबंधितांना अनुक्रमे 25 लाख व 5 लाख असा दंड केला. मात्र हा जप्त केलेल्या वाळूसाठयातुन रात्रीच्यावेळी संबंधित वाळूतस्कर हे ढंपर व जेसीबीच्या सहाय्याने वाळूचोरी करत असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांना मिळाली. त्यांनी सोमवार रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जप्त वाळूसाठयाच्या ठिकाणी छापा मारून दोन ढंपर व एक जेसीबीच्या सहाय्याने वाळूचोरी करत असता हरिभाऊ पवार, सागर हरिभाऊ पवार दोघे राहणार निंभारी ता. नेवासे व इतर चार-पाच वाळूचोरांना रंगेहात पकडले. 

मात्र या वाळूतस्करांनी तहसीलदार व त्यांच्या पथकाच्या अंगावर जेसीबी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करत जेसीबी एका शेतातून पळून घेवून गेले. तहसिलदार पाटील यांनी त्यांचा दुचाकीवरुण शेतातून पाठलाग केला. दरम्यान त्यांनी पोलिसांनाही प्राचारण केले. त्यानंतर निंभारी-पाचेगाव शिवारातील शेतात कच्च्या रस्त्यांनी महसूल व पोलीस पथक आणि दोन दुचाकीवर तलाठी, कोतवाल असे चार वाहाने या वाळूतस्करांचा पाठलाग करत होते. मात्र वाळूतस्कर तालुक्याच्या महसूल हद्दी बाहेर पळून गेल्याने महसूल-पोलीस पथक व वाळूतस्करांचा हा पाठशिवणीचा खेळ तब्बल तीन तासानंतर रात्री एक वाजण्याता थांबला.

याप्रकरणी कामगार तलाठी संभाजी भीमराव थोरात यांनी नेवासे पोलिसांत दिलेल्या फिर्यारदिवरून नेवासे पोलिसांत हरिभाऊ पवार, सागर हरिभाऊ पवार व इतर चार-पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा व सरकारी कामात अडथळा आशा विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील सर्व आरोपी फरार असून महसूल व पोलीस पथकाने एक ढंपर ताब्यात घेतला आहे.  

कारवाई तीव्र करणार - उमेश पाटील
संबंधित 100 व 24 ब्रास असे दोन वाळूसाठे जप्त करून संबंधितांना एकूण 25 व 5 लाख रूपयांचा दंड करण्यात आलेल्या वाळूचीहि चोरी करतांना आरोपींना रंगेहात पकडले होते. मात्र ते पळून गेले. तालुक्यात वाळूचोरी विरोधात कारवाई आणखी तीव्र करणार  असल्याचे 
नेवाशाचे तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Trying to kill to Tahsildar Umesh Patil By JCB