या जिल्ह्याला घातलाय क्षयरोगाने विळखा  

बेळगाव
बेळगाव

बेळगाव : जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दर सहा महिन्यातून एकदा क्षयरोग सर्वेक्षण करण्यात येत आहे.

2018 मध्ये जिल्हाभरात 2,990 क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले होते. तर 2019 मध्ये हे प्रमाण वाढले असून तब्बल 5,017 जणांना क्षयरोगाची लागण झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोगाचा विळखा घट्ट होत चालला आहे. 

क्षयरोगाला टीबी (ट्युबरक्‍युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार "मायकोबॅक्‍टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. प्रामुख्याने यात रुग्णांच्या फुफ्फुसांना बाधा होत असते. तर काही रुग्णांमध्ये फुफ्फुसासह इतर अवयवांनाही बाधा होते.

क्षयरोगमुक्‍त भारत करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यामुळे 2017 पासून दरवर्षी सहा महिन्यांतून एकदा जिल्ह्यात संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णाचा कफ संग्रहित करुन तो चाचणीसाठी पाठविण्यात येतो. दरवर्षी जुलै आणि डिसेंबर महिन्यात याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

यंदाच्या सर्वेक्षणात 5,017 जणांना क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा महिने मोफत उपचार करण्यात येत आहेत. पौष्टिक आहार सेवन करण्यासाठी सहा महिन्यापर्यंत प्रतिमहा पाचशे रुपये आर्थिक साहाय्यधन दिले जाते. तर सहा महिने औषधोपचार व योग्य काळजी घेतल्यानंतर हा आजार पूर्णपणे बरा होतो, असे आरोग्य खात्याचा दावा आहे. 

क्षयरोगाची लक्षणे 
क्षयरोग असलेली व्यक्‍ती बोलली, थुंकली किंवा शिंकली, तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात. हवेद्वारे ते जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे, अशी लक्षणे असल्यास 
क्षयरोगाची शक्‍यता असते. 

क्षयरोगाचे प्रकार 
फुफ्फुसासह इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. त्यामध्ये हाडे-सांध्याचा क्षयरोग, लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग, आतड्यांचा क्षयरोग आदींचा समावेश आहे. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी सहा महिने किंवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असते. जर उपचार मध्येच बंद केले, तर क्षयरोग परत उलटण्याची शक्‍यता असते. 


क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य खात्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षापासून घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार करण्यात येतात. 
-डॉ. अनिल कोरबू, जिल्हा क्षयरोग नियंत्रणाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com