तूर-हरभरा अनुदानासाठी बळिराजाची वणवण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मार्केटिंग फेडरेशनकडे पैसेच नाहीत; 68 हजार शेतकऱ्यांचे 79 कोटी थकले

मार्केटिंग फेडरेशनकडे पैसेच नाहीत; 68 हजार शेतकऱ्यांचे 79 कोटी थकले
सोलापूर - मागील वर्षभरापासून राज्यातील 68 हजार 310 शेतकऱ्यांना तूर-हरभऱ्यासाठी शासनाने जाहीर केलेले एक हजाराचे अनुदान मिळाले नाही. ऐन दुष्काळात अनुदानाच्या रकमेचा शेती अथवा जनावरांच्या चाऱ्याकरिता हातभार लागेल म्हणून शेतकरी दररोज हमीभाव केंद्राकडे विचारपूस करीत आहेत. काही जण प्रत्यक्ष हेलपाटे मारत आहेत; परंतु, मार्केटिंग फेडरशेनकडे पैसेच नसल्याने आता शासन हमीवर कर्ज काढून संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्‍कम दिली जाणार असल्याचे फेडरेशनकडून सांगण्यात आले.

गतवर्षी तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने आणि गोदामांची कमतरता असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रात नोंदणी करूनही त्यांच्याकडील तूर व हरभरा शासनाकडून हमीभावाने खरेदी झाला नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना बाजारात तो शेतमाल कमी किमतीने विकावा लागला. अशा शेतकऱ्यांना शासनाने प्रतिक्‍विंटल एक हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यानंतर चार-पाच महिन्यांत पात्र शेतकरी निवडण्यात आले. त्यानुसार तूर अनुदानासाठी राज्यातील एक लाख तर हरभऱ्यासाठी सुमारे 23 हजार शेतकरी पात्र ठरले. मात्र, आतापर्यंत 55 हजार शेतकऱ्यांना 70 कोटींचे अनुदान वितरित करण्यात आल्याचे मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना दुष्काळातही अनुदानाच्या रकमेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

हमीभाव केंद्रांवर नोंदणी करूनही तूर-हरभरा खरेदी न झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी शासनाच्या हमीवर मार्केटिंग फेडरेशन आता कर्ज उचलणार आहे. त्यातून त्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले जाणार आहे.
- के. जी. कानडे, सरव्यवस्थापक, मार्केटिंग फेडरेशन

तूर-हरभरा अनुदानाची स्थिती
पात्र शेतकरी 1.23 लाख
अनुदानाची रक्‍कम 149.29 कोटी
प्रतीक्षेतील शेतकरी 68,310
प्रलंबित अनुदान 79.29 कोटी

Web Title: Tur Harbhara Subsidy Farmer